
“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या”, ”गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला”अशा जयघोषात आज अनंत चतुर्दर्शीला गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यात आज 37 हजारहून अधिक घरगुती गणपती आणि 64 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
10 सप्टेंबरपासून जिल्ह्यात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. 108 सार्वजनिक आणि 1 लाख 66 हजार घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदाचा गणेशोत्सवही कोरोनाच्या सावटाखाली साजरा झाला. घरच्या गणपतीसाठी चाकरमानीही मोठ्या संख्येने कोकणात आले होते. गेले दहा दिवस घरोघरी गणपती बाप्पांची मनोभावे पुजाअर्चा करण्यात आली. कोरोनामुळे जल्लोष नसला तरी मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज सायंकाळी रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी गणपती विसर्जनासाठी गर्दी झाली होती. सायंकाळी पावसाने हजेरी लावली पण त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने उत्साहात विसर्जन झाले.





























































