कोकणात 10 टक्के मतदान वाढले

486

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघांतील 3 हजार 237 उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी सोमवारी ईव्हीएममध्ये बंद केले. देशावर ओढवलेले मंदीचे संकट, महागाई, वाढती बेरोजगारी याचा थेट परिणाम मतदानावर झाला. त्यातच लागून आलेली सुट्टी आणि पावसामुळे मतदान केंद्रांवर झालेल्या चिखलामुळे अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. मतदारांमधील निरुत्साहामुळे मतदानात 3 टक्क्यांची घसरण झाली असून राज्यभरात 60.5 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तसेच रत्नागिरी 57.19 तर सिंधुदुर्ग जिह्यात 61.65 टक्के मतदान झाले आहे.

मतदानाला पावसाची हजेरी

सोमवारी सकाळपासून शांततेत मतदान सुरू झाले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत कडक उन्हात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, मात्र सायंकाळी साडेतीननंतर रत्नागिरी शहरात ढगांच्या कडकडाटासह पावसानेही मतदानाला हजेरी लावली. भरपावसात अनेक मतदारांनी रेनकोट, छत्र्या घेऊन मतदान केंद्रांवर हजेरी लावली. लांजा तालुक्यातील लक्ष्मी नारायण कुरुप या पंचाण्णव वर्षांच्या आजीबाईंनी तरुणांना लाजवेल असा उत्साह मतदानावेळी दाखवला. त्या स्वतः मतदान केंद्रावर आल्या आणि मतदानाचा हक्क बजावला. अनेक वयोवृद्धांनी मतदान करण्यात उत्साह दाखवला. घरातील नातेवाईक मंडळी वयोवृद्धांना घेऊन मतदानासाठी येत होते. अनेक वयोवृद्ध मतदार काठी टेकत मतदानला आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या