कोपरगाव कारागृहातील पपडयाने उडवली पोलिसांची झोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी। कोपरगाव 

कोपरगाव कारागृहची अवस्था दयनीय झाली असून क्षमेतेपेक्षा जास्त कैदी झाल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात कुख्यात दरोडेखोर संजय उर्फ पपडयासह 18 दरोडेखोर सध्या कोपरगाव कारागृहात असल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. काही वर्षापूर्वी संतोष वायकर टोळीने कारागृह फोडून पलायन केले होते. त्यामुळे या कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र दुसरीकडे कारागृह प्रशासन सारे काही आलबेल असल्यासारखे निर्धास्‍त आहे.

कोपरगाव कारागृहात एकुण 5 बरॅक असून त्यातील 4 बरॅक पुरूषांच्‍या तर, 1 बरॅक महिलांसाठी आहे. सध्या या कारागृहात लोणी, राहाता, शिर्डी व कोपरगाव येथील 70 आरोपी अक्षरश: कोंबले आहेत. विशेष म्हणजे त्‍यात कोळपेवाडी दरोडयातील मास्‍टर माईंड संजय उर्फ पपडयासह 18 दरोडेखोर आहेत. संजय उर्फ पपडयावर महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश ,तेलंगाना ,उत्तर प्रदेश आदि विविध राज्यातील पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याचे नक्षलवादी कनेक्शन असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अशा खतरनाक दरोड्याखोरांमुळे कारागृहची सुरक्षा धोक्यात आली असल्यामुळे लवकरात लवकर दुरुस्ती कराण्याची मागणी होत आहे.