कोपरगाव : नगरपरिषद कर्मचारी आजपासून बेमुदत कामबंद संपावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कोपरगाव

राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या 23 प्रलंबित मागण्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. राज्य शासनाने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्य संघटनेच्यावतीने बेमुदत कामबंदची नोटीस दिल्याने 2 जुलैपासून कोपरगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. तसे पत्र नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटना ही राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे न्याय मार्गाने हक्क मिळवून देण्यासाठी मान्यता प्राप्त कार्यरत संघटना आहे. राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत प्रधान सचिव 11 ऑगस्ट 2017, मुख्यमंत्री 24 ऑगस्ट 2017 व प्रधान सचिव 1 जानेवारी 2019 अशा शासनस्तरावर तीन बैठका झाल्या होत्या. या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयावर अद्यापपर्यंत शासन आदेश झालेले नाहीत व कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाबरोबर संतापाची लाट उसळलेली आहे. कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, राज्य शासनाने वेळोवेळी नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत दुर्लक्ष केले आहे. यामुळे सर्व नगरपरिषदेचे कर्मचारी 2 जुलैपासून 19 सर्व काम बंद आंदोलन सुरू केले आहे तरीही शासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही तर सर्व अत्यावश्यक सेवेसह बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत घडणाऱ्या घटनेबाबत घटना घटनेस प्रशासन व शासन जबाबदार नाही असा इशारा संघटनेच्यावतीने पत्रातून देण्यात आला आहे.

आंदोलनाबाबत बोलताना उपाध्यक्ष सोपान शिंदे म्हणाले यामध्ये शहरातील नागरिकांना त्रास देण्याचा हेतू नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा नाही. परंतु झोपेचे सांगे घेणाऱ्या शासनाला जाग येण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने नाईलाजाने संप करणे आवश्यक आहे. तरी होणाऱ्या गैरसोयीबद्दल कर्मचारी दिलगिरी व्यक्त करीत आहेत. असल्याचेही त्यांनी म्हटले आहे या पत्रकावर अध्यक्ष चंद्रकांत साठे उपाध्यक्ष सोपान शिंदे व सचिव प्रशांत चव्हाण यांच्या सह्या आहेत.