कोपरगावातील डाऊच शिवारात भीषण अपघात,भरधाव कंटेनरची रिक्षाला धडक; 6 जण जागीच ठार, सातजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर आणि पॅगो रिक्षाच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह सहाजणांचा जागीच मृत्यू झाला असून, सातजण गंभीर जखमी झाले आहेत. कोपरगाव ते झगडे फाटा मार्गावरील डाऊच खुर्द शिवारात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

राजाबाई साहेबराव खरात (वय 60, रा. चांदेकसारे, ता. कोपरगाव), आत्माराम जमानसा नाकोडे (वय 65, रा. वावी, ता. सिन्नर), पूजा नानासाहेब गायकवाड (वय 20, रा. हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (वय 20, रा. चांदेकसारे, ता. कोपरगाव), शैला शिवाजी खरात (42), शिवाजी मारुती खरात (वय 52, दोघे रा. श्रीरामपूर) अशी मृतांची नावे आहेत.

रूपाली सागर राठोड (वय 10), ध्रूव सागर राठोड (वय 15), कृष्णाबाई गोविंद चौधरी (वय 42), सर्वेश दिगंबर चौधरी (वय 12), विलास साहेबराव खरात (वय 30), कावेरी विलास खरात (वय 5) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कंटेनरचालक दर्शन सिंग गजन सिंग (वय 41) याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

झगडे फाटय़ावरून ऍपे रिक्षा प्रवासी घेऊन कोपरगावकडे निघाली होती. डाऊच खुर्द शिवारातील पगारेवस्तीजवळ संभाजीनगरकडून मुंबईकडे लोखंडी गज घेऊन चाललेल्या कंटेनरने दुचाकीवरील तिघांना वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षाला समोरून धडक दिली. यात कोपरगावकडून झगडे फाटय़ाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने डाऊच खुर्द परिसरात पगारे वस्तीनजीक समोरून येत असलेल्या ऍपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, रिक्षात बसलेले प्रवाशांच्या जवळ असलेले सामान, विद्यार्थिनीचे दप्तर सर्वत्र विखुरले होते. या रिक्षात एकूण 12 जण बसले होते. अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी, दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षामधील चार आणि दुचाकीवरील तीन असे एकूण सातजण गंभीर जखमी झाले आहेत.