कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरातील 200 वर्षांची परंपरा बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपुर

नागपुरातील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तीर्थस्थळी सुरु असलेली 200 वर्षांपासूनची बळी देण्याची परंपरा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महालक्ष्मी जगदंबा मंदिराच्या 34 हेक्टर परिसरात बळी देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शनिवारी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच या परिसरात धूम्रपान आणि मांसाहार करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोराडीच्या श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंदिर परिसरात गेल्या 200 वर्षांपासून बकरे आणि कोंबड्यांचा बळी देण्याची परंपरा होती, मात्र शनिवार पासून ही परंपरा बंद करण्यात आली आहे. तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने व तेलाची बचत व्हावी म्हणून नवरात्रोत्सवात 10 हजार अखंड ज्योती न पेटवता फक्त एकच अखंड ज्योत लावण्याचा निर्णयही संस्थानाने घेतला आहे.