कोरिया ओपन बॅडमिंटन  – चिराग-सात्त्विक जोडीला ऐतिहासिक विजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सात्त्विक साईराज आणि चिराग शेट्टी या हिंदुस्थानच्या स्टार जोडीने कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकून इतिहास घडविला. तृतीय मानांकित हिंदुस्थानी जोडीने किताबी लढतीत फजर अल्फियान-मोहम्मद रियान या ‘नंबर वन’ इंडोनेशियन जोडीचा पराभव केला. कोरिया ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणारी ही पहिलीच हिंदुस्थानी जोडी होय.

सात्त्विक-चिराग जोडीने अंतिम लढतीत फजर-मोहम्मद जोडीचा 17-21, 21-13, 21-14 असा पराभव करीत जेतेपदावर आपले नाव कोरले. ही लढत तब्बल 62 मिनिटांपर्यंत रंगली. उभय जोडय़ांमध्ये झालेल्या पाच लढतींतील हिंदुस्थानचा हा तिसरा विजय होय. 1991 सालापासून सुरू झालेली ही स्पर्धा दरवर्षी दक्षिण कोरियाच्या वेगवेगळय़ा शहरांमध्ये होत असते. ही स्पर्धा ग्रेड-2 मधील सुपर 500 प्रकारातील होय. पी. व्ही. सिंधूने 2017 मध्ये या स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले होते. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू ठरली होती. त्यानंतर आता सात्त्विक-चिराग या हिंदुस्थानी जोडीने ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलाय. हिंदुस्थानी जोडीने उपांत्य लढतीत वेइम केंग लिआंग-चंग वांग या गतविजेत्या चिनी जोडीचा पराभव करून जेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले होते.

हिंदुस्थानी जोडीचे सलग दुसरे विजेतेपद

सात्त्विक-चिराग या हिंदुस्थानी जोडीचे हे सलग दुसरे विजेतेपद होय. याआधी या जोडीने याच वर्षी इंडोनेशिया सुपर 1000 ही स्पर्धाही जिंकली होती. याचबरोबर स्विस ओपन सुपर  500 किताब जिंकणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीचे हे यंदाच्या वर्षातील तिसरे विजेतेपद होय. या हिंदुस्थानी जोडीने 2019 मध्ये थायलंड ओपन, तर गतवर्षी इंडिया ओपनचे विजेतेपदही पटकाविले होते.