कोरठण खंडोबाच्या यात्रेत लाखों भाविकांच्या उपस्थितीत काठ्यांची महापुजा व मिरवणूक संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

प्रतीजेजुरी महात्म्य असलेल्या पिंपळगावरोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबाच्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी मानाच्या बेल्हे व ब्राम्हणवाडा येथील काठ्यांच्या शासकीय महापूजेनंतर या काठ्यांच्या कळस व देवदर्शनानंतर इतर गावच्या काठ्यांच्या मिरवणुकीनंतर सांगता झाली. सुमारे सहा लाखांवर अधिक भाविकांनी यात्रेदरम्यान खंडोबाचे दर्शन घेतले.

बुधवारी पहाटे पाच वाजता श्री खंडोबाची महापूजा महाआरती झाल्यानंतर देवदर्शन सुरू झाले. यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सकाळी १० वा. खंडोबाच्या चांदीच्या पालखीसह अळकुटी, बेल्हा, साकुरी, कांदळी, वडगाव, माळवाडी, राजापुर, सावरगाव घुले, कासारे , कळस येथील मानाच्या पालख्यांची मिरवणुक निघाली. दुपारी १२ च्या दरम्यान पालखी सोहळा मिरवणुकीने मंदिरासमोर आल्यानंतर देवस्थान व प्रशासनाने पालख्याचे स्वागत केले. यावेळी यात्रेत भाविकांच्या गर्दीचा उच्चांक झाला.

दुपारी दोनच्या सुमारास बेल्हे व ब्राम्हणवाडा येथील काठ्यांच्या मिरवणुका वाजत गाजत निघाल्या तीनच्या सुमारास दोन्ही काठ्या मंदिराच्या पायर्यावर आल्यानंतर या काठ्यांची नायब तहसिलदार रमेश काथवटे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या हस्ते काठ्यांची शासकीय महापूजा महाआरती करण्यात आली

यावेळी पोलीस उपअधीक्षक मनिष कलवालिया, उपअधीक्षक अरूण जगताप, देवस्थानचे अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड उपाध्यक्ष गंगाराम बेलकर सरचिटणीस महेंद्र नरड, सरपंच अशोक घुले, विश्वस्त मोहन घनदाट, किसन धुमाळ, अमर गुंजाळ, हनुमंत सुपेकर, दिलीप घोडके, मनिषा जगदाळे, अश्विनी थोरात, चंद्रभान ठुबे, बन्सी ढोमे, किसन मुंडे, जालिंदर खोसे, शांताराम खोसे, सुरेश गायकर, राजु मटाले, धोंडिभाऊ जगताप, गोपीनाथ घुले, चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह लाखो भाविकांचा जनसमुदाय उपस्थित होता.

महाआरतीनंतर ब्राम्हणवाडा काठीने देवदर्शन घेतले तर बेल्हे काठीने कळस दर्शन घेतले. यानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांच्या मिरवणुका झाल्या. भा.ज.प.तालुकाध्यक्ष विश्वनाध कोरडे, जि.प.सदस्या राणीताई लंके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे उपसभापती दिपक पवार आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.

नगर जिल्हयासह ठाणे, पुणे, नाशिक, संभाजीनगर, मुंबई येथून तसेच कोकण, गुजरात मधूनही भाविक कोरठणला आले होते. सर्वाधिक भाविक पुणे जिल्ह्यातुन आले होते. यात्रेच्या निमित्ताने खोबरे, भंडारा, खेळणी, मिठाई, कृषी औजारे, मनोरंजन, महिला उपयोगी व इतर साहित्य विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल झाली.

पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त व वाहतूक व्यवस्था होती. क्रांती शुगर कारखान्याच्या सुरक्षा पथकाने सुरक्षा व्यवस्था सांभाळली. जय मल्हार, अळकुटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाचे काम केले.