खमंग कोथिंबीर वडी

साहित्य ः 1 जुडी कोथिंबीर, एक कप बेसन आणि तांदळाचं पीठ, 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा जीरं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा (7-8 लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढून घ्यायच्या), मीठ चवीपुरतं, लाल तिखट, हळद.

कृती ः एक जुडी कोथिंबीर देठ काढून निवडून स्वच्छ धुऊन घ्यायची. ती व्यवस्थित सुकवून घ्यायची. ओलसरपणा ठेवू नये. या कोथिंबीर बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ, जीर, लाल तिखट, हळद, हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा, चवीपुरतं मीठ आणि पांढरे तीळ घालून हे सर्व साहित्य कोथिंबीर व्यवस्थित मिसळून घ्यावेत. मिसळताना हाताने चुरून घ्यायचं. त्यामुळे कोथिंबीरीतला ओलावा कमी होऊन पाणी कमी वापरावं लागेल. पीठ व्यवस्थित मिसळलं की, एक ते 2 चमचा पाणी घालून त्याचा गोठा करून घ्यायचा.  खूप पाणी घालायचं नाही. कोथिंबीरवडीसाठी तयार केलेल्या गोळ्यावर चमचाभर तेल घालायचं. तेल सर्व गोळ्याला लावून घ्यायचं. त्यानंतर एका ताटलीला तेल लावून त्यावर थोडेसे पांढरे तीळ पसरायचे. नंतर त्यावर कोथिंबीरवडीसाठी तयार केलेला गोळा ताटलीत थापून घ्यायचा. त्यानंतर कुकरमध्ये एक ते दीड इंच पाणी गरम करून त्यामध्ये एक स्टॅण्ड ठेवून त्यावर ही ताटली ठेवायची. महत्त्वाचं म्हणजे प्रेशर कुकरची शिटी काढून घ्यायची. मध्यम आचेवर पंधरा ते वीस मिनिटे कोथिंबीर वडीला वाफ येऊ द्यावी. पंधरा-वीस मिनिटे तिला नीट वाफ लागली की, ताटली बाहेर काढायची. सुरीने त्याचे चौकोनी किंवा शंकरपाळीच्या आकाराचे तुकडे करायचे. एका कढईत तेल गरम करून या वडय़ा तळून घ्यायच्या किंवा आवडीनुसार शॅलो फ्राय केल्या तरी चालतील. खमंग, खुसखुशीत कोथिंबीर वडी टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

आपली प्रतिक्रिया द्या