कोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू

81

सामना प्रतिनिधी, मुंबई

कोयना धरण आज पन्नास टक्के भरले आहे. सध्या धरणात तब्बल 50 टीएमसी एवढा पाणीसाठा असल्याने कोयना वीज प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती सुरू झाली आहे. धरणातील पाण्याची पातळी कमालीची घटल्याने सरकारने जूनपासून वीजनिर्मितीवर निर्बंध आणले होते.

कोयना वीज प्रकल्पाची एकूण वीजनिर्मिती क्षमता 1960 मेगावॅट एवढी आहे, तर धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी आहे. जूनमध्ये धरणातील पाण्याची पातळी मिनिमम डॅम लेव्हलच्या खाली गेली होती. त्यामुळे सदर पाणी पिण्यासाठी राखीव ठेवत जलसिंचन विभागाने कोयना वीज प्रकल्पातून होणारी वीजनिर्मिती बंद केली होती. त्यामुळे एक हजार मेगावॅट क्षमतेचा टप्पा चारची वीजनिर्मिती ठप्प होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांत धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने पाण्याची पातळी 642 मीटरपर्यंत वाढली आहे. त्यामुळे महानिर्मितीने कोयनेतून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या