
पुणे येथील सिंहगड रोडचा भाई मीच आहे, मला कोणी आडवे गेल्यास त्याला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत मोठमोठ्याने आरडाओरडा करीत हातात कोयता घेऊन नाचत दहशत पसरविल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी सराईत तडीपारासह तिघांना अटक केली आहे.
ही घटना 18 फेब्रुवारीला नऱ्हे परिसररात घडली होती. संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोशन दयानंद लोखंडे (23, रा. माणाजीनगर, नऱ्हे, स्वप्नील संजय जागडे (19, रायकर मळा) आणि किरण राजू शिंदे (28, जाधवनगर, वडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सराईत रोशन लोखंडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मात्र, तरीही 18 फेब्रुवारीला शहरात पुन्हा माघारी येऊन त्याने हातात कोयता घेऊन एका तरुणाच्या खांद्यावर बसून नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सिंहगड पोलिसांनी सराईत रोशनसह तिघांना अटक केली आहे. अशी माहिती तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी दिली आहे.


























































