बहुरंगी कृष्णजन्म … विविध प्रांतातला. !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृष्ण..  चराचरातील चैतन्य.. आपल्या साऱ्या जगण्याचे सार.. सारथी सर्वांचा,, तो म्हणजे सर्वांसाठी सर्वकाही.. कोणाचा सखा.. कोणाचा बंधू.. कोणाचा पुत्र.. कोणाचा मित्र.. मनातून व्यक्त होण्यासाठी तोच असतो. प्रत्येकाला एक तरी कृष्ण हवाच.  आपल्याकडे अनेक लोकप्रिय देव आहेत. किंबहुना ३३ कोटी देवांपैकी प्रत्येकाचे  स्वत:चे वैशिष्ट्य आहे.. स्वत:चा असा भक्त वर्ग आहे. बाप्पा आणि गौराई तर थेट आपल्या घरचे अत्यंत आवडते पाहुणे म्हणूनच येतात. बाप्पाचा वाढदिवस तर आपण वर्षातून दोनदा साजरा करतो. आदिमाया लेकामागोमाग आपल्या घरी दीड दिवसासाठी येतेच त्यशिवाय नऊ दिवस , नऊ रात्री तिचा जागर चालतो . या सर्व देव देवतांनी आपल्या लोभस आणि लडिवाळ अस्तित्वाने आपले जगणेच व्यापून टाकले आहे. पण या सर्वांवर कृष्ण दशांगुळे व्यापून उरतो… तो आपल्या घरी मुक्कामी येत नाही.. तरीही त्याने आपले जगणे व्यापून टाकले आहे. त्याचे आपल्या सोबत असणे नेहमीच पथदर्शक असते. आणि यावर सर्वांचाच ठाम विश्वास असतो. त्याचाही वाढदिवस साजरा केला जातो.. कोसळणाऱ्या पावसाच्या निबिड अंधारात अजूनही तितक्याच आतुरतेने  त्याच्या जन्माची वाट पाहिली जाते. ही वाट पाहण्यातील हुरहूर जेवढी तिष्ट्वणारी असते तेवढीच त्याच्यावरच प्रगाढ विश्वास अधिकाधिक दृढ करणारी असते. ही त्याच्या जन्माची आतुरता .. ओढ देशातील प्रत्येक प्रांतातून लागलेली असते वेगवेगळ्या स्वरूपात..
 

महाराष्ट्र – गोवा – इतर कोणताही उपवास न करणारे कृष्णजन्माचा उपवास मात्र न चुकता करतात. रात्री बारा वाजता बाळकृष्णाला पाळण्यात ठेवून दही – पोह्यांचा नैवेद्य दाखविला जातो. कोकणात आंबोली आणि शेवग्याची भाजी हा खास पदार्थ केला जातो.  विविध पाळणे, गवळण गाऊन कृष्णाची पूजा केली जाते. आरती केली जाते.

गुजरात, राजस्थान – कृष्ण मंदिराला छान रोषणाई केलेली असते. गुजरातमध्ये सातम म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्म साजरा करतात.

मध्य प्रदेश –  मध्य प्रदेशात आणि उत्तर हिंदुस्थानात पौर्णीमांत महिना असलेले पंचांग वापरत असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. कित्येकांच्या घरी गोकुळ वृन्दावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वृंदावनात दोलोत्सव साजरा केला जातो. म्हणजेच कृष्णाला पाळणा आंदोळला जातो. जम्मूमध्ये पतंग उडविले जातात.

बंगाल – येथेही कृष्ण जन्माला एक वेगळेच स्थान आहे. लहान मुलांना कृष्णाप्रमाणे सजवले जाते. कृष्णजन्मावरील नृत्यनाट्य सादर केली जातात.

दक्षिण हिंदुस्थान – दक्षिणेत कृष्ण जन्म हा मोठा सण असतो. या दिवशी कृष्णाच्या मंदिरांना दिव्यांची सजावट केली जाते. मध्यरात्री प्रकट होणाऱ्या रोहिणी ताऱ्यावर लक्ष केंद्रित केले जाते.  तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढल्या जातात. विशेष नैवेद्य केला  जातो. भगवद गीतेचे वाचन केले जाते.

 नेपाळ, बांगलादेश, फिजी –  नेपाळमध्ये रात्री उपवास करून, गीतेचा अध्याय वाचला जातो. बांगलादेशात ढाकेश्वरी मंदिरापासून एक यात्रा काढली जाते. फिजीमध्येही जन्माष्टमी साजरी केली जाते.