कुडाळात सुसज्ज बसस्थानकाची वास्तू उभी, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार

कुडाळ गांधीचौक येथील नवीन बसस्थानकाची सुसज्ज अशी वास्तू उभी राहिली आहे. या बसस्थानकात वीज जोडणी व अन्य किरकोळ कामे बाकी असून ती पुर्ण होताच लवकरच हे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे. दरम्यान या बसस्थानकाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित अपूर्ण असेलेली बारीक बारीक कामे जलदगतीने पूर्ण केली जातील अशी माहिती एस.टी प्रशासनाकडून देण्यात आली.

कुडाळ बसस्थानक हे सिंधुदुर्ग जिह्यातील मध्यवर्ती ठिकाणी येणारे बसस्थानक आहे. कुडाळ गांधीचौक येथील जुन्या बसस्थानकाची इमारत जीर्ण झाल्याने नवीन अद्ययावत असे सुसज्ज बसस्थानक व्हावे अशी मागणी प्रवाशी वर्गामधून होत होती. याची दखल घेत कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी शासनस्तरावर नवीन बसस्थानक इमारतीसाठी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांने या बसस्थानकासाठी मोठा भरीव निधी मंजूर झाल्यावर जुन्या बसस्थानकाची इमारत निर्लेखित करून ती पाडून जुन्या इमारतीच्या मागील जागेत सुसज्ज अशा बसस्थानक इमारतीची बांधणी करण्यात आली आहे. सध्या याच बसस्थानक आवारात पर्यायी प्रवाशी शेड उभारून एस.टी प्रशासनाने प्रवाशी वाहतूक सुरू ठेवली आहे.

नवीन बसस्थानकाची इमारत बांधून तिची रंगरंगोटीही पूर्ण झाली आहे. मात्र वीज जोडणी, इमारतीवर मोठे घडय़ाळ बसविणे व अन्य बारीक सारीक कामे अपूर्ण आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर लॉक डाऊन काळात ही कामे ठप्प झाली. अपूर्ण असलेली कामे पूर्ण होऊन बसस्थानक इमारत एस.टी प्रशासनाच्या ताब्यात मिळताच बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे. त्यामुळे अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करून बसस्थानक सुरू करावे अशी मागणी प्रवाशी वर्गामधून केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या