
सामना प्रतिनिधी । कुडाळ
कुडाळ तालुक्यात बुधवारीही पावसाचा जोर कायम आहे. सह्याद्री पट्ट्यात पावसाचा कहर सुरू आहेत. कुडाळ कर्ली(भंगसाळ) नदी व वेताळबांबर्डे हातेरी नदीच्या पाण्याच्या पातळीत बुधवारी सायंकाळ पासून कमालीची वाढ झाली आहे. दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुडाळ काळपनाका, पावशी घावनळे फाटा व वेताळबांबर्डे येथे सायं.7 वा.पासून महामार्ग पाणी येण्यास सुरुवात झाली. काही वेळातच पाण्याची पातळी वाढून महामार्ग बुधवारी दुस-या दिवशीही ठप्प झाला आहे. महामार्गावर वाहतूक खोळंबली आहे. प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली आहे. माणगांव खो-यातील आंबेरी पुलावर पाणी आल्याने गेले तीन दिवस माणगांव खो-यातील गावांचा संपर्क तुटलेला आहे. तालुक्यातील बरीच गावे अद्याप अंधारात आहेत.
मंगळवारी दिवसभर महामार्ग पाणी आल्याने ठप्प झाला होता. बुधवारी सकाळी रस्त्यावरील पाणी ओसरल्यावर महामार्ग पूर्ववत झाला. मात्र रात्री पुन्हा पाणी आल्याने ठप्प झाला आहे. काळपनाका येथे दोन दिवस बॉक्सवेलजवळील सर्व्हीस रस्त्यावर पाणी आल्याने दोन्ही सर्व्हिस रस्ते बंद झाले आहेत. महामार्गावरील वाहतूक तेथील बाॅक्सवेलवरून सुरू करण्यात आली. कुडाळ शहरातील गुलमोहर हॉटेल नजिक रस्त्यावर पाणी आल्याने तोही रस्ता दोन दिवस बंद आहे. पणदूर, अणाव, पावशी, वेताळबांबर्डे, कुडाळ, कविलकाटे, सरंबळ, सोनवडे, चेंदवण आदी परिसरात घरांना पाण्याचा वेढा बुधवारीही कायम होता. तालुक्यातील सुमारे 70 ते 80 कुटूंबियांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
माणगांव खो-यातील आंबेरी पुल गेले तीन दिवस पाण्याखाली आहे. उपवडे, दुकानवाड, आंजिवडे, शिवापूर या भागातही मोठ्या प्रमाणात ढगफुटीसारखा पाऊस कोसळत असून ठिकठिकाणचे कॉजवे पाण्याखाली गेल्याने सुमारे सुमारे 30 ते 32 गावांचा संपर्क तुटला आहे. कुडाळचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे पूरस्थिती लक्ष ठेवून आहेत. आमदार वैभव नाईक यांनी तालुक्यातील पूरस्थितीचा आढावा घेत संबंधित प्रशासनाला आवश्यक सुचना दिल्या आहेत.































































