कुडाळसह सिंधुदुर्गात सात दिवसांच्या बाप्पांना निरोप

471

गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया…गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला…गणपती मोरया पुढच्या वर्षी लवकर या..अशा जयघोषात रविवारी कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात दिवसांच्या गणरायांना भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. गेले पाच- सहा दिवस पावसाने हजेरी लावली होती. मात्र रविवारी दुपारनंतर काहीशी उघडीप घेतली.

कुडाळ, कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, वेंगुर्ले, दोडामार्ग व सावंतवाडी आदी सर्वच तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात मिरवणूका काढण्यात आल्या. नदि आणि तलावामध्ये ठिकठिकाणी सात दिवसांच्या गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. कुडाळ भंगसाळनदीवर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्रीपर्यंत गणेश विसर्जनाचा उत्साह सुरू होता. गेले पाच सहा दिवस पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. मात्र सातव्या दिवशी पावसाने काहीशी उघडीप दिली. त्यामुळे गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांना वाजत गाजत निरोप दिला. दिड, पाच, सात दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर मुंबईकर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या