कुल्फीय्य्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीना आंबेरकर

अश्विनातील उन्हाळा असह्य आहे… त्यावर घरच्या घरी कुल्फीचा उतारा देऊया…

सध्या प्रचंड उकाडय़ाने मुंबईकर हैराण झाले आहेत. थंड हवा, थंड पाणी, आईक्रीम, कुल्फीसारखे पदार्थ यांच्या मदतीने उकाडय़ाचा ताप कमी करण्याचा आपण प्रयत्न करतो. सतत बाहेरून आईक्रीम किंवा कुल्फी मागवणे प्रत्येकाच्या खिशाला परवडतेच असे नाही. हे पदार्थ जर आपण घरच्या घरी करून खाल्ले तरी खिशाला थोडे तरी हलके वाटेल. त्यासाठी आज आपण बघूया कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची. कुल्फी दुधापासून दूध आटवून तयार करताना त्यात खवा, कॉर्नफ्लॉवर लावून दूध दाट करतात असे दूध ताजे सायी सकट असावे. दूध आटवताना ते तळाला लागू नये म्हणून जाड बुडाचे पातेले वापरावे व ते डावाने सतत हलवत राहावे. कुल्फीमध्ये खवा चुरून, कस्टर्ड पावडर/कॉर्नफ्लॉवर यापैकी एकाचा वापर दूध लवकर सेट व्हावे म्हणून करतात. परंतु मूळ दुधाच्या निम्मे दूध आटून झाल्यावर त्यास यापैकी एक जिन्नस लावावा, तरच ते नीट सेट होते.

कुल्फीसाठी तयार केलेल्या म्हणजेच आटवलेल्या दुधास त्याचा मसाला लावावा. हा मसाला तयार करताना वेलची पूड, जायफळ पूड, केशर, बदाम, पिस्ते, काजू यासारख्या पदार्थांचा वापर करावा. याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यावे. कुल्फीचे दूध थंड झाल्यावर त्यात मसाला घालावा. नंतर त्याचे मोल्ड ओलसर करून हे मिश्रण त्यात घालून मोल्ड डीप फ्रीझमध्ये ठेवावे. कुल्फी सेट होण्यासाठी 24 तास लागतात. प्लॅस्टिकच्या साच्यापेक्षा धातूचे साचे अधिक उपयुक्त ठरतात. साच्यांमध्ये कुल्फी सेट झाल्यावर हे साचे कोमट पाण्यात प्रथम बुडवावेत म्हणजे प्रत्येकातून कुल्फी पटकन सुटून येईल. एकदा दूध आटवून घेतले की मग आपल्याला त्यात भिन्न चवीचे पदार्थ घालून कुल्फीला वेगवेगळी चव आणता येते

man

मँगो कुल्फी

साहित्य…बेसिक कुल्फीचे सर्व साहित्य व 1 कप गोड व मिक्सरमधून काढलेला आंब्याचा रस.

कृती…सर्व कृती बेसिक कुल्फीप्रमाणेच करावी. फक्त मोल्डमध्ये घालून दूध मिश्रण सेट करण्यास ठेवण्याआधी यात आंब्याचा रस घालावा. ब्लेंडरमधून हे मिश्रण एकदा फिरवून घ्यावे. नेहमीप्रमाणे कुल्फी सेट करण्यास ठेवावी.

ऑरेंज कुल्फी

साहित्य …दूध 1 लिटर, साखर आवडीनुसार, मोठी संत्री 3 ते 4, 4 चमचे मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर.

कृती…जाड बुडाच्या पातेल्यात दूध घाला. उकळत ठेवा. बुडास लागू देऊ नका. पाव वाटी दूध वेगळे काढा. त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर कालवून घ्या व ते उकळून दाटून येणाऱया दुधात घाला व ढवळत राहा. तळाला लागू देऊ नका. पाच मिनिटांनी यामध्ये मिल्क पावडर घाला व ढवळा. पाच मिनिटांनी गॅस बंद करा. संत्री सोलून रस काढा व गाळून घ्या. हे दुधात घाला व रवीने ढवळून घ्या. चार-पाच संत्र्याच्या फोडी रस न काढता त्याचे तुकडे करून ते ढवळलेल्या मिश्रणात घालून मिश्रण साच्यामध्ये घाला व सेट होऊ द्या.

बेसिक मसाला कुल्फी

साहित्य…दूध दीड लिटर, साखर चवीनुसार, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, दुधाचा (कुल्फीचा) तयार मसाला दीड चमचा.

कृती…जाड बुडाच्या पातेल्यात दूध ओता. मध्यम आचेवर ठेवा. एक उकळी आली की आच मंद करून मधूनमधून पळीने ढवळत दूध आटवा ते निम्मे करा. त्यात साखर घाला. परत ढवळा व साखर पूर्णतः विरघळू द्या. दूध आटवत ठेवा, थोडे दूध वाटीत काढा व त्यात कॉर्नफ्लॉवर घाला व बोटाने ढवळून, कालवून घ्या  व दुधात घालून ढवळा. दूध खूप आटले की गॅस बंद करा. निवण्यास ठेवा. आधी दिलेल्या सूचनेनुसार कुल्फी तयार करा.

ice-creame-23

पिस्ता बदाम कुल्फी

साहित्य…दूध 1 लिटर, मिल्क पावडर 1 चमचा, व्हॅनिला कस्टर्ड 1 चमचा, साखर पाऊण कप, कण्डेन्स मिल्कचा 1 डबा. कुल्फी मसाला 1 चमचा, प्रत्येकी 8 ते 10 बदाम व पिस्ता (पाण्यात भिजवून, सोलून, खापा करून) ब्रेडचे ताजे कडा कापलेले 2 तुकडे.

कृती…जाड बुडाच्या पातेल्यात दूध, साखर व कण्डेन्स मिल्क घाला. मध्यम आचेवर पातेले ठेवा. दूध ढवळत उकळत ठेवा. दूध उकळू लागल्यावर त्यात ब्रेडचे तुकडे बारीक चिरून घाला. ढवळा व एक जीव करा. गॅस बंद करा. मिश्रण थंड झाले की, त्यात मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर घाला. मग ब्लेंडरमधून हे मिश्रण काढा व चांगले एकजीव करा. एका डब्यात हे मिश्रण घाला. झाकण घट्ट लावून फ्रीझरमध्ये ठेवा व सेट करा. 5 ते 6 तासांनी हे मिश्रण काढा. परत ब्लेंडरमधून फिरवून घ्या. यात मसाला घाला, परत डब्यात ओता, झाकण घट्ट लावा, परत डीप फ्रीझमध्ये ठेवा. 10 ते 15 तासांनी हा डबा बाहेर काढा. थोडय़ा बोथट सुरीने डब्यातच याच्या खापा पाडा व प्लेटमध्ये घालून सर्व्ह करा.