माफी मागणार नाही, दंड भरणार नाही, स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा यांची ठाम भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिपब्लिक टीव्हीचा मुख्य संपादक अर्णब गोस्वामीला जामीन मंजूर झाल्यासंदर्भातील ट्विटमुळे स्टॅण्डअप का@मेडियन पुणाल कामरा यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल झाला आहे. कामरा यांनी त्यावर ट्विट करत आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले आहे. ‘माझे ट्विट मागे घेणार नाही. ना वकील, ना माफी, ना दंड, ना वकील. वेळ वाया घालवणार नाही.’ असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय एकतर्फी असल्याची प्रतिक्रिया कामरा यांनी ट्विटरवर दिली होती. कामरा यांची ती प्रतिक्रिया म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे सांगत त्यांच्याविरुद्ध काही विद्यार्थी आणि वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. देशाचे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांच्या संमतीनंतरच ही याचिका दाखल करून घेण्यात आली.

कामरा यांच्याविरोधात याचिका दाखल करणाऱयांमध्ये विधी शाखेचे विद्यार्थी श्रीरंग काटनेश्वरकर, निकीता दुहान आणि वकील अमेय शिरसीकर, अभिषेक रासकर, सत्येंद्र मुळे यांचा समावेश आहे. त्यातील दुहान ही दिल्लीची असून इतर याचिकाकर्ते हे पुणे आणि संभाजीनगर जिह्यातील आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणाऱयांना शिक्षा करण्याची वेळ आता आली आहे असे सांगत वेणुगोपाळ यांनी त्यांची याचिका दाखल करून घेतली.

माझ्यापेक्षा नोटबंदी, जम्मू-कश्मीर, ईव्हीएमसंदर्भातील याचिकांकडे जास्त लक्ष द्या!
‘मी माझ्या मतावर ठाम आहे. इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयाने जे मौन बाळगले आहे ते टीका न करता दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. माझ्यावरील खटल्याला जो वेळ आणि महत्त्व दिले जात आहे त्यापेक्षा जास्त लक्ष नोटबंदी, जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे आणि इलेक्ट्रॉनिक मतदानासंदर्भात दाखल झालेल्या प्रकरणांकडेही देण्याची गरज आहे.’ असेही कामरा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी एका ट्विटमध्ये आपण सर्वोच्च न्यायालयात महात्मा गांधींऐवजी हरीश साळवे यांचा फोटो लावण्याची मागणी केली होती असे सांगतानाच पंडित नेहरूंच्या जागी महेश जेठमलानी यांचा फोटो लावण्याची मागणी केली आहे.