
सामना ऑनलाईन । भिवंडी
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारी डावलल्यामुळे नाराज असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेश सरचिटणीस व कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचे राजीनामे दिले आहेत. विश्वनाथ पाटील हे भिवंडी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र ऐनवेळी त्यांना डावलून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज होते. शहापूर येथे आयोजित भूमीपुत्रांच्या निर्धार सभेत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली असून लवकरच पुढच्या राजकीय वाटचालीबाबतचा निर्णय जाहीर करणार आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे भिवंडी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
भिवंडी लोकसभा मतदार संघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने तत्कालीन विद्यमान खासदार सुरेश टावरे यांचे तिकीट कापून कुणबी मतांची टक्केवारी लक्षात घेऊन विश्वनाथ पाटीलांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे देशभरात मोदी लाट असतांना देखील पाटील यांचा भाजपच्या कपिल पाटील यांच्याकडून निसटता पराभव झाला होता. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीत मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाकडून पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत विश्वास पाटील यांना विश्वास होता. मात्र पाटील यांचा पत्ता कापल्यामुळे कुणबी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. याचा काँग्रेसला मोठा फटका बसणार असून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना फायदा होणार आहे.

























































