कुंडलीतील महादशा शुभ कशी ठरते?

2350

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद)

प्रवीण त्याच्या कुंडलीच्या विवेचनसाठी आला होता. कुंडली अभ्यासत असतांना त्याच्याशी बोलत होते. नोकरी, त्याचे पुढील शिक्षण ह्यांवर चर्चा सुरू होती. त्याच्या कुंडलीला असलेल्या शनिच्या महादशेवर मी लक्ष केंद्रित केले. ही महादशा तुला फलद्रुप ठरेल,तुझी मेहनत आणि प्रयत्न सुरूच ठेव हे सांगितल्यानंतरही प्रवीणच्या चेहेऱ्यावरचे काळजीयुक्त भाव तसेच होते. थोडावेळ थांबून प्रवीनेच विचारले,” मला सध्या शनिची महादशा सुरु आहे ना ?”

“अर्थात” इति मी.

“नाही म्हणजे तुम्हांला खरं सांगतो, तुमच्याकडे येण्याआधी काही महिन्यांपूर्वी मी एका दुसऱ्या ज्योतिषांकडे गेलो होतो. त्यांनी मला सांगितले की तुझी शनिची महादशा सुरू होत आहे तेंव्हा जरा सांभाळून रहा. नोकरीत बडतर्फीचे योग आहेत. कदाचित नोकरी जाऊ शकेल. बदनामी सुद्धा होऊ शकते. तब्येतीचीही काळजी घेण्यास सांगितलं. असं सगळं ऐकून मी खूप घाबरलो आहे ताई आणि तुम्ही म्हणताय योग चांगले आहेत. मी नक्की काय समजू?”

प्रवीणची ही भीती काढणे अत्यंत महत्त्वाचे होते परंतु त्याच प्रमाणे त्याला सत्य सांगणेही गरजेचे आहे. त्याला त्याच्या कुंडलीची ओळख करून द्यायची असं ठरवून लॅपटॉपचा स्क्रीन त्याच्या समोर ठेवला. कुंडलीतील काही महत्त्वाचे भाव त्याला समजावून सांगितले –

१) धन स्थान – तुमची सांपत्तिक स्थिती समजते.

२) षष्ठ स्थान – तुम्ही नोकरी करणार असाल तर नोकरीचे स्वरूप कोणते हे समजून येते.

३) अष्टम स्थान – तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे ह्या स्थानावरून समजून येतात.

४) लाभ स्थान – तुम्हांला होणारे लाभ.

५) तुमची राशी – त्यावरून तुमच्या मानसिक प्रगल्भतेची कल्पना येते.

आणि सर्वात शेवटी मी त्याला महादशा म्हणजे काय हे समजावले –

महादशा किंवा दशा म्हणजे कुंडलीतील प्रत्येक ग्रहाचा एक ठराविक कालखंड. प्रत्येक ग्रहाची महादशा ही वेगवेगळ्या कालखंडासाठी असते –

रवि – ६ वर्षे

चंद्र – १० वर्षे

मंगळ – ७ वर्षे

बुध – १७ वर्षे

गुरु – १६ वर्षे

शुक्र – २० वर्षे

शनि – १९ वर्षे

राहू – १८ वर्षे

केतू – ७ वर्षे

ह्या सर्व महादशेत लोकांमध्ये हा गैरसमज असतो की शनिची,राहूची महादशा सर्वात वाईट आणि गुरु,शुक्राची महादशा सर्वात चांगली. (काहींना तर शनिची साडेसाती आणि शनीची महादशा म्हणजे एकाच वाटते. अर्थात त्यांचा तो अभ्यास नसल्याने त्यांना दोष देत नाही परंतु आपला दुर्गुण म्हणजे जेवढं वाईट तेवढंच लक्षात राहतं. असं असू नये. ) ग्रह वाईट किंवा चांगला हे विश्लेषण आपणहूनच लावू नये. तुमच्या कुंडलीत ‘तो’ ग्रह कोणत्या भावाचा कारक होतो ? कोणत्या राशीत तो आहे? कोणत्या नक्षत्रात आहे? त्या ग्रहाचा तुमच्या कुंडलीवर किती प्रभाव आहे? ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे.

प्रवीणप्रमाणेच बऱ्याच लोकांचा हा गैरसमज असतो की शनिची महादशा वाईट कारण शनि हा वाईट ग्रह आहे. खरं तर तसं नाही. शनि हा ग्रह न्यायकारक आहे. आणि हाच शनि जर तुमच्या कुंडलीत षष्ठ स्थानाचा आणि लाभ स्थानाचा कार्येश असेल तर अर्थात ही महादशा तुमच्या करिअरच्या दृष्टीने खूप फलद्रुप असेल. शनि महादशेच्या आधी गुरु ह्या ग्रहाची महादशा असते. गैरसमजुतीमुळे ही महादशा खरंतर खूपच चांगली असली पाहिजे. परंतु बऱ्याच व्यक्तिंच्या कुंडलीत सुरू असलेल्या गुरु महादशेने त्यांना चांगलाच संघर्ष करायला लावला आहे. अशा कुंडलीत गुरु ह्या ग्रहाची स्थिती फारशा चांगल्या स्थितीत आढळली नाही. गुरु अष्टम अथवा व्यय (बाराव्या )स्थानाचा कार्येश आढळून आला आहे. आणि ह्या उलट शनिची स्थिती चांगली असल्याने त्या जातकाला चांगली फळे मिळाली आहेत.

हे देखिल वाचा – संतती योग आणि मानसिक दडपण

ह्या सगळ्या Explanation नंतर प्रवीणचे सर्व गैरसमज दूर झाले. त्याला जी भीती वाटत होती ती आता नाही. त्यालाही आतापर्यंत ऐकीव गोष्टींवर विश्वास असल्याने अशा गोष्टींच्या खोलात जाण्याची गरज त्याला वाटली नाही. परंतु त्यामुळे कायम अशी भीती मनात घर करून राहते.

एखादे “Generalised Statements” देण्याआधी ह्यांवर नक्की विचार करा. शनिप्रमाणेच राहूच्या महादशेचीही खूप भीती वाटते. हा गैरसमज दूर व्हावा म्हणून राहू महादशेवर मी गेल्यावेळेस लेख लिहिला होता. वाचला नसल्यास नक्की वाचा. लिंक इथे देत आहे –

राहू महादशा: शिक्षण, करिअरचा बट्ट्याबोळ? कि आशेचा किरण?

त्याच प्रमाणे शनिच्या साडेसातीला घाबरणाऱ्या व्यक्तिंसाठी साडेसातीवर असलेला व्हिडिओ –

हा लेख आणि व्हिडिओ तुम्हांला नक्की उपयुक्त ठरतील.

सर्वात शेवटी महादशा म्हणजेच प्रत्येक ग्रहाचा एक कालखंड. त्याप्रमाणे आपल्या जीवनांत गोष्टी घडत असतात. आपले प्रयत्न आणि सकारत्मक विचार ठेवल्यास नकारत्मक परिस्थितीतही चांगल्या गोष्टी घडवून आणता येतात. स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका.

कसा वाटला हा लेख? प्रतिक्रिया जरूर कळवा – [email protected]

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)

आपली प्रतिक्रिया द्या