संतती योग आणि मानसिक दडपण

406

anupriya-desai-astrologer>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद)

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम सर्वांवरच दिसू लागला आहे. मोबाईलच्या वापरामुळे अगदी २-३ वर्षांच्या मुलांच्या डोळ्यांवर हल्ली चष्मे दिसू लागले आहेत. जेवणात सकस आहार न मिळाल्यामुळे आपल्या सर्वांनाच औषधांमार्फत व्हिटॅमिन्सची पूर्तता करावी लागते. मुंबईतल्या वास्तूत सूर्याची सकाळची सूर्याची किरणे प्रवेश करीत नाहीत त्यामुळे शरीरात “ड” जीवनसत्वाची कमतरता जाणवतेय. त्यासाठी डॉक्टरांकडून इंजेक्शन्स घ्यावी लागतात. हे सर्व विचित्र वाटत असलं तरी ह्या गोष्टी आता लोकांच्या अंगवळणी पडत चाललेल्या आहेत. बदलत्या जीवनशैलीचा अजून एक परिणाम म्हणजे जोडप्यांना संतती होण्यात बऱ्याच अडथळ्यांना पार करावं लागतंय.

गेल्या ४-५ वर्षात संतती योगाबद्दल विचारायला येणाऱ्या जातकांमध्ये वाढ झालेली आहे. लग्नानंतर काही वर्षातच संतती होण्याची अपेक्षा असते परंतु काही जोडप्यांसाठी ही नैसर्गिक गोष्ट वैद्यकीय मदतीने घडवून आणावी लागते. नुसत्याच वैद्यकीय मदतीने ही गोष्ट शक्य नसून स्वतःची मानसिक शक्तिही तेवढीच प्रबळ असावी लागते. अशाच काही जोडप्यांचा प्रवास आज ह्या लेखाद्वारे तुमच्यासमोर मांडतेय.

पहिली केस आहे सुमनची – सुमन माझ्याकडे आली होती तेंव्हा लग्नाला ३-४ वर्ष झाली होती. मधल्या काळात सुमनला एकदा प्रेग्नन्सी राहिली होती परंतु काही कारणांमुळे सातव्या महिन्यांत “Miscarriage” झाले. अत्यंत खट्टू झालेल्या सुमनने माझी भेट घेतली होती. तिला “Medical” च्या मदतीनेच संतती योग असल्याचे सांगितले. परंतु एकदा का प्रेग्नन्सी राहिली की अत्यंत काळजी घेण्याचीही गरज सांगितली. नोकरी सोडावी लागेल आणि बेडरेस्ट घ्यावी लागले ह्याबाबत समजावले. नक्की योग आहेत ना ? हे पुन्हा पुन्हा विचारून सुमन निघाली. त्यानंतर सुमन माझ्याबरोबर फोनवरून संपर्कात होती. डॉक्टरांची भेट घेतली,डॉक्टर काय म्हणाले ? कोणती treatment घ्यावी लागणार ह्याबाबत झालेली चर्चा मला वेळोवेळी कळवत होती. Treatment सुरू झाल्यानंतर तिला मी नोकरीबाबत विचारले तेंव्हा तिने नोकरीतून रजा घेण्याची गरज वाटत नाही तेंव्हा नोकरी सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. सहाव्या महिन्यांत पोटात दुखू लागल्याने तपासणीसाठी गेली असता गर्भाशयाचे मुख अतिरिक्तरित्या open असल्याचे समजले. डॉक्टरांनी जरुरी उपचार करून होणारी पुढचा अनर्थ टाळला. त्यानंतर तिला बेडरेस्टचा सल्ला दिला गेला. सुमन त्यानंतर तीन महिने घरून ऑफिसचे काम करीत होती. नऊ महिने पूर्ण करून एका गोंडस बाळाचा जन्म झाला होता. इप्सित साध्य झाले. सगळीकडे आनंदीआनंद होता. परंतु त्यासाठी सुमनला दिव्यातून जावे लागले होते. तिनेही ह्या सर्व treatment घेतांना हिंमत दाखवली. एकदा झालेले miscarriage आणि त्यानंतर घेतलेली treatment ह्या सर्व कठीण परीक्षा सुमनने पार केल्या आहेत.

दुसरी केस आहे देवश्रीची – देवश्रीला लग्नाच्या दुसऱ्या वर्षीच प्रेग्नन्सी राहिली. परंतु दीड महिन्यानंतर जेव्हा तपासणी केली तेव्हा बाळ मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि ताबडतोब “abortion”चा सल्ला दिला. “abortion” केल्यानंतर काही महिने देवश्री मानसिक दडपणाखाली होती. सहा-सात महिन्यांत देवश्री पुन्हा प्रेग्नन्ट राहिली. ह्यावेळेस तर असे काही होणार नाही ना ह्यासाठी आम्ही तिच्या कुंडलीची चर्चा केली. असे काही होणार नाही परंतु काही “challenges” मात्र असतील तेंव्हा काळजी घेण्याचा सल्ला दिला. सहाव्या महिन्यांत देवश्रीला “Gestational Diabetes” असल्याचे तपासणीत समजले. Blood Pressure चाही त्रास सुरू झाला. पुन्हा एक दडपण!! ह्या सर्वातून जातांना तिच्या देवावरच्या भक्ती आणि श्रद्धेमध्ये जराही फरक पडला नाही. किंबहुना मानसिक शांतीसाठी काही स्तोत्र वाचन सुरु होती. नवव्या महिन्यांच्या तपासणीत “सिझरिन” करावे लागेल हे समजल्यावरही देवश्री निश्चल होती. नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर सिझर पद्धतीने बाळाचा जन्म झाला.

तिसरी केस आहे जागृतीची – २०१७ साली जागृती माझ्याकडे संतती योग कधी ह्या विषयी सल्ला घेण्यास आली होती. २००९ साली लग्न झाले असून त्यानंतर सात वेळेस प्रेग्नन्सी राहिली असल्याचे तिने सांगितले. सातही वेळेस सहाव्या किंवा सातव्या महिन्यांत “Miscarriage” झाले. हे होण्याचे कारण म्हणजे जेंव्हा जेंव्हा जागृतीला प्रेग्नन्सी रहात होती त्यानंतर तिच्या रक्तातील तांबड्या पेशींचे प्रमाण अचानक कमी होत होते. असे प्रत्येक वेळेस झाले. तरीही हिंमत न हारता जागृती प्रत्येक आव्हाहनाला सामोरी जात होती. आतापर्यंत मुंबईतल्या डझनभर डॉक्टरांकडे जागृती जाऊन आली होती. ही अत्यंत “delicate” केस होती. तिची कुंडली,तिच्या नवऱ्याची कुंडली आणि ज्यावेळेस जागृती माझ्याकडे आली होती त्यावेळेची प्रश्नकुंडली व्यवस्थित अभ्यासल्यावर तिला संततीचे योग निश्चितपणे आहेत हे सांगितले. तिला २०१८ साली संततीचे योग असल्याचे सांगितले. तिच्या वास्तूतही काही आवश्यक उपाय केले. ह्याच्या दुसऱ्या महिन्यांतच जागृतीने प्रेग्नन्सी राहिल्याचे कळवले. मानसिक स्वस्थतेसाठी काही स्तोत्रे वाचण्यास दिली होती. त्याचे वाचन सुरूच होते. जागृती सतत संपर्कात होती. ह्या वर्षीच्या एप्रिल महिन्यांत संध्याकाळी जागृतीच्या नवऱ्याचा फोन आला. अत्यंत आनंदित होता. मुलगा झाला होता. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित असल्याचे कळवले.

चौथी केस आहे सायलीची – सायली,अत्यंत बोलघेवडी आणि लाघवी. लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी समजले की तिच्यात काही दोष आहेत. अंडाशयातून निर्माण होणाऱ्या अंड्यामध्ये काही दोष आहेत. नवराच्या शुक्राणूंमध्येही काही दोष होते. दोघांनीही त्यावर औषधोपचार सुरू केले. डॉक्टरांनी “IVF”चा सल्ला दिला होता. ह्या दरम्यान कुंडली विवेचनसाठी माझी २०१६ साली भेट घेतली. २०१७ ला संतती योग असल्याचे कुंडली दर्शवत होती. परंतु ह्या सर्वांत एक समस्या अशी होती की २०१६ सालीच सायलीचा नवरा (रितेश )तीन वर्षांसाठी ऑस्ट्रेलियाला कामानिमित्त गेला होता. २०१७ला संतती योग म्हणजे रितेशने आताच भारतात परत यायला हवे आहे. लगेच सुट्टी मिळणे कठीण होते. आता हे जमायाचे कसे ? तिला treatment सुरु ठेवण्याचा सल्ला दिला. Treatment पूर्ण झाल्यानंतर रितेशला कामानिमित्तानेच भारतात काही आठवड्यांसाठी परत यावे लागले. आल्यानंतर त्याचेही रिपोर्ट्स नॉर्मल असल्याचे कळले. ह्या दरम्यान डॉक्टरांनी IVF treatment सुरु केली. रितेश पुन्हा परदेशात परतला. सायलीवर treatment पूर्ण झाली आणि २०१७ साली सायलीने जुळ्या मुलींना जन्म दिला. लग्नाच्या ५ वर्षानंतर संतती योग जुळून आला होता.

वरील सर्व केसेस एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. ह्या सर्व केसेस तुमच्या समोर मांडण्याचे एकच कारण म्हणजे आव्हाहने सर्वांनाच कमी -अधिक प्रमाणात आहेत. आपल्याला आपले त्रास,वेदना नेहेमीच दुसऱ्यांपेक्षा जास्त वाटत असतात. ह्याचे कारण म्हणजे दुसऱ्यांना कुठल्या दिव्यातून जावे लागतेय ह्याची आपल्याला कल्पनाच नसते. हल्ली जोडप्यांकडून संततीयोगाबद्दल विचारणा सतत होत असते. प्रत्येक जोडप्याला वाटते की हे प्रॉब्लेम्स आमच्याच वाट्याला का ? आम्हांलाच का ह्या सर्व परीक्षा द्याव्या लागणार ? त्यांच्यासाठी आजचा लेख. लेख लिहिण्याचा उद्देश एवढाच की आशा सोडू नका. विश्वास ठेवा,सकारात्मक विचार ठेवा,आलेल्या आव्हाहनांनी डगमगून जाऊ नका,यश नक्की मिळेल.

कसा वाटला हा लेख? प्रतिक्रिया जरूर कळवा – [email protected]

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)

आपली प्रतिक्रिया द्या