वंशपरंपरागत इस्टेट घोळ कुंडली सोडवू शकते!

183

>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद)

ठाण्यातील एका बड्या हस्तीची पत्नी आणि कन्या(सविता) कुंडली विवेचनासाठी आल्या होत्या. कुंडलीतून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाल्यांनतर सविताची गाडी मूळ प्रश्नाकडे वळली. “आम्ही सहा भावंडे. चार बहिणी आणि दोन भाऊ. बाबा गेल्यापासून प्रॉपर्टीसंदर्भात कोणी विषयच काढला नाही परंतु आता इतक्या वर्षानंतर हा प्रश्न विचारात घ्यावा अशी मी भावंडांना विनंती केली परंतु दोन्ही भावांनी बहिणींचा ह्यावर हक्क नाही असे सांगून विषय तिथेच संपवण्याचा प्रयत्न केला. आम्हा बहिणींना आमचा अधिकार हवा असे ठणकावून सांगितल्यानंतरही भावांवर काहीच परिणाम झाला नाही. आईने आम्हांला सध्या हा विषय काढू नका शांत रहाण्यास सांगितले. त्यानंतर दोन्ही भावांनी आम्हा बहिणींपैकी दोन बहिणींना काय पट्टी पढवली माहित नाही त्या दोघीनींही आता आम्हाला प्रॉपर्टीत स्वारस्य नसल्याचे सांगितले. राहिलो आम्ही दोघी. आता गेल्याच महिन्यांत तिसऱ्या बहिणीने सुद्धा माघार घेतली आहे. परंतु मला माझा अधिकार सोडायचा नाही. सगळे प्रयत्न करतेय मी पण भाऊ अजिबात दाद देत नाही. आईने मला असं काही करू नको, भाऊ वाटणी नक्की देतील असं सांगून पोलीस आणि वकिलांकडे जाऊ देत नाही.” आई बरोबरच आलेल्या असल्याने त्यांची बाजू ऐकता ऐकता सविताच्या कुंडलीचे विवेचन सुरू होते. आईचे म्हणणे,” भावांनी प्रॉपर्टीची वाटणी दिली पाहिजे हे खरे. पण त्यांना लोभ आवरत नाही. सगळ्यांचे सध्या व्यवस्थित सुरू आहे. देवाच्या कृपेने कोणालाही आर्थिक चणचण नाही. सविता सुद्धा आज ठाण्यात स्वतःच्या बंगल्यात राहते. बाकीच्या बहिणींचेही सर्व सुरळीत सुरू आहे. मग माझे म्हणणे कशाला पाहिजे प्रॉपर्टी? उगीच नात्यात कडूपणा आणायचा ? म्हणून हिला समजावतेय पण हिला ही गोष्ट समजतांच नाही.” ह्यांवर सविताच उत्तर म्हणजे,” जरी सर्व सुरळीत सुरू आहे तरी कायद्याने मला अधिकार दिला आहे. आज वकिलाच्या एका नोटिसाने हे काम लगेच होणार आहे. माझा मोठेपणा म्हणून मी भावांना नोटीस पाठवत नाही. बाबांने कष्टाने उभी केलेली फॅक्टरी. त्याचा संपूर्ण कारभार भाऊच बघतात. आम्हांला फॅक्टरीत येऊ सुद्धा देत नाहीत. बाबांची ठाणे-पुणे इथे असलेली प्रॉपर्टी. मी फक्त माझा अधिकार मागतेय. हे त्यांनी स्वतःहून द्यायला हवे ते मला मागावे लागतेय. आईला भावांचा कावा समजत नाही. असं करून त्यांनीच नात्यात कडूपणा आणलाय ते का दिसत नाही हिला? मला आता कुंडलीवरून हे समजावून सांगा सहजासहजी मला प्रॉपर्टी मिळेल की मी भावांना नोटीस पाठवू ?”

अशा केसेस कमी अधिक फरकाने माझ्याकडे आल्यानंतर त्यांचे कुंडलीतील योग तर तपासावेत लागतात त्याच बरोबर काही व्यक्तिंच्या कुंडलीत कोर्ट-कचेरीने प्रॉपर्टी ताब्यात घ्यावी लागणार का हे सुद्धा पहावे लागते. स्वतःची प्रॉपर्टी असणे,विकत घेणे आणि वंशपरंपरागत प्रॉपर्टी मिळणार का? ह्याचे योग वेगवेगळ्या स्थानांनी दर्शविलेले असतात.

कुंडलीतील चतुर्थ स्थान म्हणजे प्रॉपर्टीचे स्थान. परंतु हे स्थान स्वतःच्या प्रॉपर्टीबद्दल माहिती देते. चतुर्थ स्थानातील ग्रह,त्या ग्रहांच्या इतर राशी कुंडलीत कुठे आहेत? तुमच्या महादशा तुम्हांला प्रॉपर्टीत invest करण्यासाठी पूरक आहेत का? हे सर्व जमून आले की तुम्ही तुमची प्रॉपर्टी घेऊ शकता. परंतु चतुर्थ स्थानातील ग्रह,चतुर्थ स्थानाचा स्वामी किंवा महादशा तुम्हांला support करत नसतील तर प्रॉपर्टी घेण्यासाठी तुम्हांला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. काहीवेळेस तर गुंतवलेले पैसे बिल्डरकडून पुन्हा मागून घ्यावे लागतात. बिल्डरकडून पैसे परत मिळणे म्हणजे एक दिव्यच आहे. काही वेळेस पैसे गुंतवले,बँकेचे हफ्ते सुरु झाले तरी घरचा ताबा लवकर मिळत नाही.

वंशपरंपरागत प्रॉपर्टीसाठी चतुर्थ स्थानाबरोबरच अष्टम आणि लाभ स्थानाचाही एकमेकांशी योग असावा लागतो. काही वर्षांपूर्वी माझ्याकडे आलेल्या केसमध्ये असाच प्रश्न विचारला गेला होता. सिंह लग्नाची कुंडली. चतुर्थेश मंगळ अष्टमेश गुरूबरोबर अष्टमातच. गुरु बुधाच्या नक्षत्रात आणि बुध धनस्थान, लाभ स्थानाचा स्वामी. कृष्णमूर्ती पद्धतीने पाहिल्यास चतुर्थ स्थानाचा सबलॉर्ड गुरुच. गुरु ८ स्थानाचा कार्येश. त्यामुळे वंशपरंपरागत प्रॉपर्टीत वाटणी नक्की मिळणार. त्याप्रमाणे त्यांना भावाने स्वतःहूनच प्रॉपर्टीची वाटणी करून त्यांचा अधिकार त्यांना दिला.

ह्याच अनुषंगाने एक Interesting केस माझ्याकडे काही वर्षांपूर्वी आली होती ती म्हणजे, जातक अगदी मध्यमवर्गीय समाजातील. परंतु एक दिवस घराचे shifting करतांना त्याला काही कागदपत्रे सापडली. काही शेअर सर्टिफिकेट्स होती. त्याच्या बाबांनी बऱ्याच वर्षांपूर्वी ती घेऊन ठेवली होती. काळाच्या ओघात ते विसरून गेले. मुलाने सर्व सर्टिफिकेट्सची मार्केटमधील किंमत तपासून पाहिली. काही कोटींच्या घरात त्याची किंमत होती. त्याच्या पत्रिकेत चतुर्थापेक्षा पंचमेश (पंचम स्थान – शेअर्स ) गुरु धन स्थानाचा सुद्धा स्वामी. पंचमात आत्माकारक रवि. त्यामुळे वंशपरंपरागत प्रॉपर्टी अशा प्रकारेसुद्धा मिळू शकते.

एका व्यक्तिने (व्यक्ति स्वतः रिक्षा चालवत होते) आपल्या व्यवसायातून झालेल्या नफ्यातून जमीन खरेदी करावी ह्या उद्देशाने ओळखीच्या एका तलाठ्याची भेट घेतली. रेकॉर्डस् जेंव्हा काढले गेले तेंव्हा त्या गावातील काही एकर जमीन ह्याच्या पणजोबांच्या नावावर होती ते सुद्धा सातबाराच्या उताऱ्यासकट. काही पुरावे सादर केल्यानंतर जमिनीचा ताबा ह्या व्यक्तिला देण्यात आला. काही square feet जमीन खरेदी करण्यास गेलेल्या व्यक्तिला काही एकर जमीनीचा ध्यानीमनी नसतांना लाभ झाला.

तुमच्या कुंडलीतील चतुर्थ, अष्टम, लाभ स्थानाबरोबरच इतर स्थाने जितकी महत्त्वाची तितकेच कुंडलीतील महादशा महत्त्वाची. supportive महादशा जोपर्यंत नाही तोपर्यंत प्रॉपर्टीचा ताबा मिळणे अशक्य. काही व्यक्तिंना प्रॉपर्टीचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टकचेरी करावी लागते. काहींना कागदपत्रे मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते. काई वर्षांपूर्वी Taxi No. 9211 ही फिल्म आली होती. जॉन इब्राहिम आणि नाना पाटेकर ह्या फिल्मचे हिरो. जॉन इब्राहिमला प्रॉपर्टीसंदर्भात काही कागदपत्रे कोर्टात सादर करायची होती परंतु काही कारणास्तव ही कागदपत्रे वेळेत कोर्टात सादर करू न शकल्याने कोट्याधीश जॉन इब्राहिम एका रात्रीत रावाचा रंक होऊन जातो. ह्याच कारणामुळे होणारी पत्नी सुद्धा त्याला सोडून जाते. फिल्मच्या शेवटी नाना पाटेकरकडून त्याला ही कागदपत्रे मिळतात आणि जॉन इब्राहिमला त्याची वंशपरंपरागत प्रॉपर्टी मिळते.

तुमच्याही कुंडलीत आहेत का वंशपरंपरागत इस्टेटीचे योग ते नक्की तपासून पहा.

कसा वाटला हा लेख? प्रतिक्रिया जरूर कळवा – [email protected]

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)

summary: kundali will help you in property matters

आपली प्रतिक्रिया द्या