11 मार्चपासून कुणकेश्वर यात्रा प्रारंभ

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुणकेश्वर येथील श्री देव कुणकेश्वर यात्रौत्सव 11 ते 13 मार्च या कालावधीत संपन्न होत असून ही यात्रा केवळ मंदिर पुजारी, मानकरी, स्थानिक ग्रामस्थ यांच्या पुरती ग्रामस्तरावर मर्यादित आहे. 50 व्यक्तींच्या उपस्थितीत पूजा व धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

सामाजिक अंतर राखण्यासोबतच कोरोनाचे नियम पाळून मानकरी, स्थानिक ग्रामस्थ यांना दर्शन घेता येईल, असे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रशासन व श्री कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रा.प.कुणकेश्वर,व ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत बोलताना सांगितले.

दर्शनास येणाऱ्या स्थानिक नागरिक, स्वयंसेवक, पदाधिकारी व मानकरी यांची कोरोना तपासणी करूनच मंदिरात प्रवेश देण्यात येईल. अन्य कोणत्याही व्यक्तींना जत्रेच्या दिवशी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असेही यावेळी प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या ठिकाणचे तिन्ही मार्ग पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत.

आज कुणकेश्वर येथे जिल्हा प्रशासन कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रा.प. तसेच स्थानिक ग्रामस्थ यांची जत्रा नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तसेच बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर परिसराची पाहणी करत आवश्यक त्या सूचना केल्या.

मंदिर प्रवेशद्वारावर कोरोनाविषयक आरोग्य तपासणी करण्यात येईल आणि नंतरच मंदिरात प्रवेश देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी सांगितले. दर्शनार्थींच्या तपासणीकरिता आरोग्य विभागाच्या एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य पथकाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शिवाय रुग्णवाहिकेची सोयही केली आहे, अशी माहिती यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र राठोड यांनी दिली.

यात्रेच्या दिवशी 11 मार्च रोजी रात्री 12 वाजल्यानंतर विधिवत पूजा पुजाऱ्यांमार्फत करण्यात आली. त्यानंतर 50 व्यक्तींना सामाजिक अंतर राखून देवस्थान ट्रस्ट, ग्रा.प. ग्रामस्थ यांच्या सहकार्याने प्रशासनाच्या सूचनेनुसार दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. बाहेरील व्यापारी, नागरिक, भाविक भक्त, लोकप्रतिनिधी व अन्य व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. त्याकरिता देवस्थान ट्रस्टने सलग तीन दिवस भाविकांकरिता थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन सुविधा घरबसल्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात येईल. मंदिर परिसरात कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही, अशी सूचना यावेळी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच गर्दी आटोक्यात राहावी याकरिता मंदिर परिसरात बाहेरील व्यापारी अथवा स्थानिक व्यापारी यांना कोणत्याही प्रकारचा स्टॉल उभारता येणार नाही. तसेच मंदिर परिसरात स्थानिक ग्रामस्थांचे जे कायमस्वरुपी हॉटेल, दुकाने व स्टॉल आहेत त्याव्यतिरिक्त नवीन स्टॉलना परवानगी देण्यात येणार नाही, अशी सूचना यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या