
सामना ऑनलाईन, मुंबई
मध्य रेल्वेवर महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने 15 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा पंधरवडय़ाचा समारोप एका छोटेखानी कार्यक्रमाने झाला. या सोहळय़ात नीटनीटकेपणा आणि स्वच्छतेबाबत कुर्ला कारशेड तसेच विदर्भ एक्सप्रेसला प्रथम पुरस्कार देण्यात आला, तर ट्रान्सहार्बरवर धावलेल्या ‘स्वच्छता’ लोकलचाही खास गौरव करण्यात आला.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त तसेच स्वच्छता पंधरवडय़ाच्या समाप्तीनिमित्त सीएसएमटीच्या रेल्वे ऑडिटोरियमच्या विविध अकरा श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट देखभाल व स्वच्छतेसाठी कुर्ला ई.एम.यू. कारशेडला प्रथम तसेच कळवा कारशेडला द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच मुंबई कंट्रोल ऑफिसला प्रथम तर नागपूरला द्वितीय, मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेसला प्रथम तर मुंबई-अमरावती एक्सप्रेसला द्वितीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
सात स्थानकांवर डिजिटल वॉल
मध्य रेल्वेच्या ऐतिहासिक वारसा आणि रेल्वेच्या माहितीपटांचे सादरीकरण करण्यासाठी सीएसएमटी येथे मोठा स्क्रिन लावण्यात आला असून अशा प्रकारचे डिजिटल वॉल ठाणे, लोणावळा, पुणे, दौंड, सेवाग्राम आणि वर्धा येथे लावण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी स्पष्ट केले. स्वच्छता लोकलच्या ट्रान्स हार्बरवर चार फेऱ्या झाल्या असून त्याचे प्रवाशांनी स्वागत केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंते ए. के. अग्रवाल, प्रधान मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक शैलेंद्र कुमार आदी उपस्थित होते.
स्वच्छता लोकलचा गौरव
उत्कृष्ट देखभाल कारखाना वर्गवारीत प्रथम क्रमांक माटुंगा तर द्वितीय ट्रक मशीन कारखाना (नाशिक) यांना पुरस्कार मिळाला. डिझेल-इलेक्ट्रिक शेड वर्गवारीत प्रथम पुरस्कार अजनी (नागपूर) इलेक्ट्रिक लोकोशेड, द्वितीय डिजीट लोकोशेड (कल्याण), कोचिंग डेपो वर्गवारीत प्रथम पुरस्कार पुणे, द्वितीय पुरस्कार सोलापूर, डिव्हिजनल रुग्णालय वर्गवारीत भुसावळला प्रथम तर नागपूरला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला. तर ‘स्वच्छता ही सेवा’ असा संदेश देणाऱ्या लोकलला रंगविणाऱ्या कल्याणच्या रेल्वे शाळेतील मुलांचा आणि कळवा कारशेडच्या कर्मचाऱ्यांचाही खास गौरव करण्यात आला.































































