कुर्ला-घाटकोपरमधील 173 झोपडीधारकांना पालिकेकडून जागा रिकामी करण्याची नोटीस

244
bmc

विमान उड्डाणांना धोकादायक असल्याचे सांगत ‘फनेल झोन’च्या नावाखाली कुर्ला, घाटकोपर पश्चिममधील तब्बल 173 झोपडीधारकांना पालिकेने एका आठवडय़ात जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शेकडो कुटुंबीयांवर बेघर होण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेनेने आज सुधार समितीच्या बैठकीत उघड केला. पालिकेने या नोटिसा मागे घेव्यात, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

कुर्ला पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम परिसरातील रहिवाशांना पालिकेच्या ‘एल’ वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी या ‘351-कलमा’खाली नोटिसा पाठवल्या असल्याचे आज किरण लांडगे यांनी सुधार समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा मांडून निदर्शनास आणून दिले. संबंधित ठिकाणचे रहिवासी 1972पासून राहत आहेत. मात्र पालिका प्रशासनाकडून संबंधित रहिवाशांकडे 1964च्या वास्तव्याचे पुरावे मागितले जात आहेत. कुर्ला-घाटकोपरमधील मुकुंदराव आंबेडकर नगर, हनुमान टेकडी, जरीमरी, संजय नगर, अशोक नगर आदी भागातील झोपडीधारकांना अशा नोटिसा पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले. विमानतळाचे व्यवस्थापन पाहणाऱया ‘जीव्हीके’ कंपनीच्या सांगण्यावरून जाणीवपूर्वक आणि अन्यायकारक नोटीस देण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. या वेळी सर्वपक्षीयांनी शिवसेनेच्या मागणीला पाठिंबा दिला. भाजपचे अभिजित सामंत यांनीदेखील विलेपार्ले विभागात ‘जीव्हीके’ कंपनीकडून मनमानीपणे झोपडय़ांची मोजणी करून रहिवाशांवर अन्याय केला जात असल्याचे सांगितले. संबंधित कंपनीची मोजणी संशयास्पद असल्याचेही ते म्हणाले. या वेळी शिवसेनेचे राजू पेडणेकर, काँग्रेसचे अश्रफ आझमी, भाजपचे विनोद मिश्रा आदींनी हरकतीच्या मुद्दय़ाला समर्थन देत पालिकेने या नोटिसा तातडीने मागे घ्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

आधी पुनर्वसनाची हमी द्या!

दरम्यान, सर्वपक्षीयांनी संबंधित शेकडो कुटुंबीयांना पालिकेने बेघर करू नये, अशी जोरदार मागणी केली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे आणि अन्यायकारक नोटीस मागे घ्यावी, असे आदेश सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी दिले. संबंधित रहिवाशांना आधी पुनर्वसनाची हमी द्यावी, असेही ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर उपायुक्त रमेश पवार यांनी संबंधित प्रकाराची चौकशी करण्यात येईल आणि अयोग्य पद्धतीने नोटीस पाठवण्यात आली असेल तर मागे घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने 100 दिवसांची कारकीर्द पूर्ण केली त्यानिमित्त भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आणि कामगार सेना महासंघाच्या वतीने अभिनंदन केले.

आपली प्रतिक्रिया द्या