कुरुंदवाडात स्वच्छ भारत अभिमानचा बोजवारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरात विभागातील परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बऱ्याच ठिकाणी गटारे तुंबल्याने परिसरातील रस्त्यांवरून दुर्गंधीयुक्त घाण पाणी ओसंडून वाहत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरात स्वच्छ भारत अभियान राबवले जाते. मात्र या अभियानात अस्वच्छ शहर बनले आहे. शहर स्वच्छतेसाठी वर्षाला 1 कोटी 40 लाख खर्च होतात म्हणजे महिन्याला 11 लाख व दिवसाला जवळपास 40 हाजार स्वच्छतेवर खर्च केले जातात इतके पैसे खर्च करूनही शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे कोठ्यावधी रुपये कोणाच्या खिशात जातात, हा सवाल नागरिकांच्यातून होऊ लागला आहे.

शहरातील अनेक ठिकाणी व प्रमुख चौकातील भागात गटारे गेल्या अनेक दिवसांपासून तुंबली आहेत. विविध भागात अगोदरच दैनंदिन साफसफाई अभावी नेहमीच दुर्गंधी पसरलेली असताना त्यात या गटारीच्या घाण पाण्याची भर पडली आहे. त्यामुळे इतरांना स्वच्छतेचे शहाणपण शिकवणार्‍या पालिकेच्याच दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र आहे.

शहर व परिसरात रस्त्यावर गटारीचे घाण पाणी वाहत असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे.शहरातील प्रमुख भागात मोठी लोकवस्ती आहे. त्यामुळे या भागात नेहमीच मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने दुर्गंधीमुळे लहान मुले वयोवृद्ध व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक मात्र त्रासून गेले आहेत.

येथील लोकप्रतिनिधी या विभागात फिरकत नाहीत प्रभागातील नागरी समस्या काय आहेत हे जाणून घेण्याची कधी तसदी घेतले नाहीत सत्ता आणि पद यामध्ये व्यस्त असणारे लोकप्रतिनिधीकडुन विकासाची अपेक्षा नसल्यामुळे नागरिकांना तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न पडत आहे.

अनेकवेळा पालिकेकडे स्वच्छतेबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे. स्वच्छता वेळेवर होत नसल्यामुळे गटारींमध्ये पाणी तुंबते. या साचलेल्या सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात सर्वत्र पसरते. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने परिसरात आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

गटारीच्या घाण पाण्यामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला असून साथरोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे या भागातील नागरिकांनी सांगितले.