प्रति जेजुरीत ‘जय मल्हार’चा जयघोष, बेल भंडाऱ्याची उधळण

92

सामना प्रतिनिधी । पाटोदा

पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखले जाणारे कुळदैवत खंडोबा यात्रे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने कुसळंब परिसर अक्षरशः दुमदुमून निघाल होता.

कुसळंब येथील खंडेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रात प्रति जेजुरी म्हणून ओळखले जाते. चंपाषष्ठी निमित्त कुळदैवत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी ग्रामस्थांच्या वतिने करण्यात येते भाविक भक्तासाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. वर्षातून तीन वेळेस खंडेश्वराचा उत्सव साजरा होते. या उत्साहाने परिसर दुमदुमतो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक भक्त खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे जागृत खंडोबा देवस्थान असल्यामुळे परिसरातील भाविक भक्त वर्षातून तीन वेळा हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी येतात. खंडोबा यात्रेची सुरुवात तळी उचलल्या नंतर महाआरती करुन होते. चंपाषष्ठी निमित्त महाआरती करुन संपुर्ण गावामध्ये खंडोबाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. बेल भंडाऱ्याची उधळण करत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करत पालखी मिरवणूक मंदिरामध्ये घेऊन भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांकडून भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या