कुसुमाग्रजांच्या शिरवाडे वणीला ‘कवितेचे गाव’ अशी नवी ओळख एका दालनाचे उद्घाटन

अभिजात साहित्याद्वारे मराठी मनावर अधिराज्य करणारे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या शिरवाडे वणी या गावास ‘कवितेचे गाव’ ही ओळख मिळाली आहे. आज त्यांच्या जयंतीदिनी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी येथे ही घोषणा केली. तसेच कवितेच्या एका दालनाचे उद्घाटनही केले.

मराठी भाषा विभाग, राज्य मराठी भाषा विकास संस्था आणि शिरवाडे ग्रामपंचायत यांच्या वतीने आज शिरवाडे वणीला ‘कवितेचे गाव’ म्हणून घोषित करण्यात आले. तेथील दालन क्रमांक -1चे उद्घाटन उदय सामंत यांनी केले. पुढील वर्षीपासून येथे दोन दिवसीय कुसुमाग्रज महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. पुढील चार महिन्यांत परिपूर्ण कवितेचे गाव साकारेल, वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल, असे ते म्हणाले.

या वेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, सरपंच दिलीप खैरे, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार हेमंत टकले, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, कुसुमाग्रज यांच्या नात पिहू शिरवाडकर आदींसह मान्यवर, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.