
अरबी समुद्रात तयार झालेले कायर चक्रीवादळ रायगडच्या दिशेने सरकण्याची शक्यता लक्षात घेऊन किनारपट्टीच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनी 29 ऑक्टोबर पर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये तसेच खोल समुद्रात गेलेल्या बोटी परत किनाऱ्यावर आणाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, कर्मचारी मच्छीमार बंदरांवर नजर ठेवून आहेत. मांडवा ते गेटवे ही जलवाहतूक सेवाही बंद करण्यात आलेली आहे.
1 सप्टेंबरपासून मच्छिमारांनी मासेमारीला सुरुवात केलेली आहे. मात्र पावसाने अजून दडी मारलेली नसल्याने मच्छीमारांना आधीच आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यातच आता अरबी समुद्रात कायर चक्रीवादळ घोंघावत असल्याने मत्स्य विभागाकडून 24 ते 29 दरम्यान समुद्रात मच्छीमारीसाठी जाण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आधीच पावसाने मच्छीमार संकटात सापडले असताना पुन्हा सहा दिवस मच्छीमार बोटी ठेवाव्या लागणार आहेत.
चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाल्याने मच्छिमारांनी आपल्या बोटी किनाऱ्याबर लावल्या आहेत. जिल्ह्यात समुद्रकिनारी सध्या हजारो मच्छीमार बोटी रायगडच्या वेगवेगळ्या किनाऱ्यावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. मच्छीमारांनी आपल्या बोटी समुद्रात नेऊ नये अशा सूचना मत्स्यविभागाकडून देण्यात आल्या आहेत.किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क राहावे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे. ‘उरण येथील काही मच्छीमार हे समुद्रात मच्छीमारीसाठी गेले असून त्यांना जवळच्या समुद्र किनारी आसरा घेण्यास सांगितले आहे’, अशी माहिती अभयसिंह शिंदे इनामदार, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांनी दिली.


























































