प्रादेशिक कामगार संस्थेच्या विद्यार्थ्यांना सोडले वाऱ्यावर ,कामगार उपायुक्तांचा मनमानीपणा

399

नागपूरच्या प्रादेशिक कामगार संस्था येथून अभ्यास दौऱ्यासाठी निघालेल्या 24 विद्यार्थ्यांना मुंबईत तब्बल 80 तास समन्वयकाविना काढावे लागले. 4 डिसेंबर रोजी नागपूरहून अभ्यास दौऱ्यासाठी निघालेल्या या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शकाला कामगार उपायुक्तांनी अचानक स्टडी टूर अर्ध्यातच सोडण्याचे फर्मान धाडले तसेच गेली पाच वर्षे नागपूरच्या संस्थेत काम करत असताना अचानक मुंबईच्या संस्थेत रुजू होण्याचे आदेश दिले. त्यांच्या या मनमानी कारभारामुळे संबंधित विद्यार्थ्यांना कुठल्याही मदतीशिवाय स्वखर्चाने राहावे लागले.

नागपूरच्या प्रादेशिक कामगार संस्थेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले 24 विद्यार्थी 4 डिसेंबर रोजी अभ्यास दौऱ्यासाठी निघाले होते. पुणे, महाबळेश्वर, मुंबई, नाशिक आणि संभाजीनगर असा त्यांचा 20 दिवसांचा अभ्यास दौरा होता. यात प्रादेशिक कामगार संस्थेचे संशोधन सहाय्यक प्रकाश निमजे त्यांना समन्वयक म्हणून मार्गदर्शन करत होते. 13 डिसेंबर रोजी हे विद्यार्थी मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या गेस्ट हाऊसमध्ये थांबले. यावेळी निमजे यांना कामगार उपायुक्तांनी अचानक बोलावणे धाडले. गेली पाच वर्षे नागपूरच्या प्रादेशिक कामगार संस्थेत संशोधन सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या निमजे यांना कामगार उपायुक्तांनी मुंबईच्या नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेत रुजू होण्यास सांगितले. हे विद्यार्थी अचानक कुठे जाणार, त्यांना मार्गदर्शन कोण करणार, त्यांना मुंबईतली काहीच माहिती नाही याबाबत सवाल केला असता कामगार उपायुक्तांनी उत्तरे देण्याऐवजी सर्व विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली. तसेच निमजे यांनाही सुनावले. या सर्व प्रकाराने सर्व विद्यार्थी भांबावून गेले.

विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय; मुली प्रचंड घाबरल्या
या विद्यार्थ्यांमध्ये 10 मुले आणि 14 मुली आहेत. 13 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत असे 80 तास या विद्यार्थ्यांना कुठलीही मदत मिळाली नसल्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय झाली. विशेष म्हणजे यात 14 मुली होत्या. या सर्व मुली प्रचंड घाबरल्या होत्या. 16 डिसेंबर रोजी हे विद्यार्थी ज्या बसने आले होते त्याच बसने परतीच्या वाटेला लागले. सध्या त्यांचा मुक्काम संभाजीनगर येथील एमपी लॉ कॉलेज येथे असून कामगार उपायुक्तांनी दोन फॅकल्टीजना त्या ठिकाणी पाठवले आहे, परंतु आता पाठवून काय उपयोग? ज्या दिवशी आपल्याला मुंबईच्या संस्थेत रुजू व्हायला सांगितले त्याच दिवशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक द्यायला हवे होते असे निमजे यांनी सांगितले.

माजी विद्यार्थी आणि पालकांचा संताप
यात 14 मुली होत्या. त्यामुळे त्यांची सुरक्षितताही धोक्यात आली. या विद्यार्थ्यांचे काही बरेवाईट झाले असते तर याची जबाबदारी संस्थेने घेतली असती का, असा सवाल पालकांनी केला आहे. तसेच मुंबई आणि नागपूरमधील संस्थेचे व्याख्याते आणि माजी विद्यार्थ्यांनीही याप्रकरणी प्रचंड रोष व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या