2 किलो शिव्या… तुम्ही वजन केले का? विरोधकांना उत्तर देण्याची धमक नाही,खरगेंचा मोदींना सणसणीत टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरोधकांनी जे मुद्दे मांडले त्यावर सभागृहात उत्तर देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात धमक नाही. ते फक्त शंभर वर्षांच्या गोष्टी उगाळतात, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निशाणा साधला. दोन किलो शिव्या दिल्या म्हणता, तुम्ही शिव्यांचे वजन केले का, असा सणसणीत टोलाच खरगे यांनी लगावला.

पंतप्रधानांच्या भाषणावर प्रतिक्रिया देण्याची खरंतर आवश्यकता नाही. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी फालतू बडबड केली आहे ते पाहता त्यांना उत्तर द्यावेच लागेल, असे नमूद करत खरगे यांनी तोफ डागली. रोज दोन किलो शिव्या खातो, या मोदींच्या विधानाची खरगे यांनी खिल्ली उडवली. इतक्या शब्दांत शिव्या दिल्या असं म्हटलं तर समजू शकतो, पण दोन किलो, एक क्विंटल शिव्या हा काय प्रकार आहे. मोदी शिव्यांचे वजन करतात का, असा खोचक सवाल खरगेंनी केला. खोटय़ा गोष्टी पुनः पुन्हा सांगण्याची सवय मोदींना लागली आहे. राज्यसभेतील 97 मिनिटांच्या भाषणात मोदींनी आम्ही जे मुद्दे उपस्थित केले. त्यापैकी एकाही मुद्दय़ावर उत्तर दिले नाही, असे खरगे यांनी सुनावले.

जनरल नरवणेंचे पुस्तक झळकावले त्याची इतकी मिरची का लागली?

जनरल नरवणेंचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. ते आम्हाला मिळू शकते मग तुम्हाला कसे मिळत नाही. ते पुस्तक प्रकाशित झालेले नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलतात. गृहमंत्री अमित शहाही तेच सांगतात. इतका खोटेपणा कशासाठी, असा सवाल करतानाच राहुल गांधी यांनी हे पुस्तक झळकावले तेव्हा तुम्हाला इतकी मिरची का लागली तेच समजत नाही, असा टोला खरगेंनी लगावला. सत्य तुम्हाला ऐकावंच लागेल, असेही त्यांनी निक्षून सांगितले.