
एकीकडे शांततापूर्ण तोडग्याच्या चर्चा करीत दुसरीकडे चीनची लष्करी हेलिकॉप्टर्स आणि लढाऊ विमाने सीमेवर हिंदुस्थानी लष्कराला वाकुल्या दाखवत आहेत. पूर्व लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेजवळ चिनी सैन्याच्या हेलिकॉप्टरच्या हालचाली वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी लष्कराने चिनी फायटर किमानांची घुसखोरी रोखण्यासाठी उंचावरील प्रदेशात खांद्यावरुन मिसाइल डागता येणाऱया ‘इग्ला’ एअर डिफेन्स सिस्टमसह जवानांच्या तुकडय़ा तैनात केल्या आहेत.
‘शत्रुच्या विमानांनी हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यास त्यांना तात्काळ प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थानी सैन्याने उंचावरील प्रदेशात रशियन बनावटीच्या इग्ला एअर डिफेन्स सिस्टमसह जवानांना तैनात केल्याचे वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. रशियन बनाटीच्या या एअर डिफेन्स सिस्टमचा हिंदुस्थानी लष्कर आणि हिंदुस्थानी हवाई दल दोघेही वापर करतात. युद्धाच्या प्रसंगात किंवा शत्रूची फायटर विमाने, हेलिकॉप्टर लष्करी तळाजवळ येतात, तेव्हा या सिस्टमचा वापर केला जातो. या भागात हिंदुस्थानने आपली टेहळणी क्षमताही वाढवली आहे.
रडार्सच्या माध्यमातून चिनी हालचालींवर लक्ष
लडाख सीमेवरील चीनच्या हवाई हालचालींवर रडार्सच्या माध्यमातून लक्ष ठेवले जातेय. तसेच जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रही सज्ज ठेवण्यात आली आहेत. हिंदुस्थानी हद्दीतील भागांमध्ये चिनी हेलिकॉप्टर्स प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सैन्याला अनेकदा दिसले आहे. पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याच्या हेलिकॉप्टर्सनी हवाई हद्दीचे उल्लंघन करू नये, यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून हिंदुस्थानी हवाई दलाने सुखोई फायटर किमाने तैनात केली आहेत.

























































