
सामना प्रतिनिधी । पुणे
आपल्या बंडखोर भूमिका सडेतोड स्वभावामुळे लालन सारंग यांनी केवळ मराठी रंगभूमी क्षेत्रातच नव्हे तर मराठी रसिकांच्या मनात कायमचे स्थान मिळविले. त्यांच्या मनातच कायम एक बंडखोर चंपा दडलेली होती. त्या बंडखोरीचा त्यांनी केवळ स्वतःच्याच नव्हे तर मराठी रंगभूमीच्या उत्कर्षासाठी उपयोग केला. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीची बंडखोर चंपा हरपल्याची भावना कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली.
कीर्ती शिलेदार (अखिल भारत नाटय़संमेलनाच्या अध्यक्षा):
लालन सारंग या रंगभूमीवरील एक अत्यंत कर्तबगार अभिनेत्री होत्या. आमच्या शिलेदार कुटुंबीयांचा आणि लालन सारंग यांचा संबंध फार पूर्वीपासून आला आहे. गोपीनाथ सावकारांनी बसविलेल्या ‘चमकला धुकाचा तारा’ या संगीत नाटकात त्यांनी कामसुद्धा केले आहे. या नाटकात लालन सारंग यांच्यासोबत जयमाला शिलेदार आणि लता शिलेदार यांनी काम केले होते. त्यांच्या कामात व्यवस्थितपणा असायचा.
विनोद तावडे (सांस्कृतिक मंत्री):
आपल्या लक्षवेधी अभिनयाने लालन सारंग यांनी अभिनयविश्व गाजवले. प्रयोगशील अभिनेत्री म्हणून सर्वश्रुत असणाऱया लालनजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रसाद कांबळी (अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद अध्यक्ष):
लालन सारंग यांच्या त्यांच्या काळात बंड करून रंगभूमीकर ‘सखाराम बाइंडर’ या नाटकात काम केले. त्यांनी त्या काळात बंडाचे निशाण रोवून रंगभूमीवर काम केले. त्यांचा नाटय़प्रवास येणाऱया काळातील पिढीसाठी, नाटय़कर्मींसाठी दिशा देणारा ठरला. सर्व रंगकर्मी, नाटय़ परिषदेतर्फे आणि माझ्या कुटुंबीयांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
रत्नाकर मतकरी, ज्येष्ठ साहित्यिक
‘जोडीदार’ आणि ‘खोल खोल पाणी’ या माझ्या दोन नाटकांत त्यांनी काम केले होते. या दोन्ही नाटकांची निर्मिती त्यांच्याच ‘कलारंग’ संस्थेची होती. कोणत्याही भूमिकेत त्या जीव ओतून काम करायच्या. ‘सखाराम बाईंडर’मधली चंपा असो, ‘रथचक्र’मधील ब्राह्मण स्त्री असो किंवा ‘जोडीदार’मधील घराला सांभाळणारी स्त्री. अशा विविध भूमिकांचे आव्हान त्यांनी लीलया पेलले. त्या उत्तम खवय्या होत्या. माशांचे वेगवेगळे पदार्थ करणे हा त्यांचा छंद होता.
मराठी नाटय़संमेलनाच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या निधनाने कलेशी निष्ठा राखणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. सारंग यांचा रंगभूमीवरचा समर्थ वावर कायम प्रयोगशीलता जपणारा होता. प्रवाहाच्या विरुद्ध असलेल्या भूमिका साकारण्याचे आव्हान पेलण्याचे धाडस दाखवताना त्यांनी आपली अभिनयक्षमताही सिद्ध केली. यामुळे त्यांची कारकीर्द एक अमीट ठसा उमटवणारी ठरली.
-देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)




























































