
लालबाग हत्याकांड प्रकरणात काळाचौकी पोलिसांनी एका संशयित तरुणाला आज यूपीतून आणून त्याची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. तो तरुण त्याच परिसरात सॅण्डविचचा धंदा करत होता. या तरुणाव्यतिरिक्त रिंपल ज्या व्यक्तींशी संपर्कात होती त्यांच्याकडेही चौकशी केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
लालबागच्या इब्राहिम कासीम चाळीत राहणाऱया वीणा जैन यांचा मृतदेह घरातच सापडल्याने तसेच मृतदेहाचे तुकडे केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. वीणा यांच्या मृतदेहाचे त्यांचीच मुलगी रिंपल हिने तुकडे करून लपवून ठेवले होते. 27 डिसेंबरला वीणा या पहिल्या मजल्यावरून खाली पडल्या होत्या. त्यावेळी दोघा तरुणांनी त्यांना उचलून घरी नेले होते; मात्र त्यानंतर पुन्हा कधी वीणा दिसल्या नाहीत. या कालावधीत लालबाग परिसरात सॅण्डविचचा धंदा करणारा तरुण रिंपलच्या सतत संपका&त होता. 7 जानेवारीला तो तरुण यूपीला निघून गेला होता. तरीही त्याचे रिंपलशी बोलणे सुरू होते. त्यामुळे काळाचौकी पोलिसांच्या एका पथकाने यूपीमधून त्याला चौकशीसाठी मुंबईत आणले आहे.
त्यावेळीच नातेवाईकांना सांगण्याचा सल्ला
27 तारखेच्या पहाटे वीणा पहिल्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर दोघा तरुणांनी त्यांना उचलून घरी नेले होते. त्यावेळी वीणा यांची हालचाल होत नव्हती. त्यामुळे याबाबत नातेवाईकांना सांग असे एका तरुणाने रिंपलला सांगितले होते. पण रिंपलने त्याचे न ऐकता मग तिच्या आईचे तुकडे करून ते लपवून ठेवले होते असे पोलीस तपासात समोर येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.























































