
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुजोर कार्यकर्त्यांमुळे वादाच्या भोवऱयात सापडलेल्या ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळाला सरकारने लगाम घातला आहे. या मंडळाचा कारभार आता धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली चालणार आहे.
‘लालबागचा राजा’ गणपती मंडळाविरोधात बऱयाच तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. कार्यकर्त्यांची मुजोरी, व्हीआयपी रांगेतून घुसखोरी याबरोबरच दानपेटीतील रकमेच्या सुरक्षेबाबतही तक्रारी होत्या. त्यामुळे यापुढे या गणपतीकडील दानपेटीतील रक्कम आणि दागिन्यांची मोजदाद हे काम धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली चालणार आहे. याशिवाय दर्शन रांगा कशा असाव्यात, व्हीआयपी रांगांमधून कोणाला प्रवेश मिळावा याबाबतही धोरण ठरवण्यास समिती नेमली जाणार आहे.




























































