
40 लाख रुपयांच्या बक्षिसांच्या ऑरियनप्रो मुंबई आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर स्पर्धेत हिंदुस्थानचा ग्रॅण्डमास्टर ललित बाबूने विजेतेपद पटकावले, तर आणि ज्युनियर बुद्धिबळ गटात कॅण्डिडेट मास्टर मधेश कुमारने बाजी मारली.
ग्रॅण्डमास्टर विभागाच्या नवव्या आणि शेवटच्या फेरीमध्ये ललित बाबूने अव्वल मानांकित जॉर्जियाचा ग्रॅण्डमास्टर लव्हिन पंतसुलियावर मात करत निर्णायक एक गुण मिळवत आपली गुणसंख्या 8 वर नेली. अन्य बोर्डवर झालेल्या लढतीत अर्मेनियाचा ग्रॅण्डमास्टर मामिकॉन घरिबयाननेही हिंदुस्थानच्या ग्रॅण्डमास्टर नीलोत्पल दासला पराभवाचा धक्का देत त्याला जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर केले. मात्र या विजयामुळे मामिकोनचेही आठ गुण झाले. मात्र, सरस टाय-ब्रेक स्कोअरच्या आधारे ललित बाबूला (54.5) विजेता घोषित करण्यात आले. घरिबयानला (54) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ललित बाबूने जेतेपदाच्या ट्रॉफीसह 4 लाख रुपयांची कमाई केली. उपविजेता घरिबयानला 3 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. हिंदुस्थानचा आणखी एक खेळाडू दीपन चक्रवर्ती पाचव्या स्थानावर राहिला.
ज्युनियर विभागात शांत आणि प्रतिभावान मधेशने आठ गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले. त्याने शेवटच्या फेरीत व्योम मल्होत्रावर विजय मिळवला. मधेशने त्याच्या उत्तम कामगिरीसाठी विजेतेपदाच्या चषकासह 2 लाख रुपये मिळवले. उपविजेता अद्विक अग्रवाल याला 1.5 लाख रुपये मिळाले. अव्वल मानांकित अंश नेरुरकरला तिसऱया क्रमांकासह 1 लाख रुपयांच्या बक्षिसावर समाधान मानावे लागले. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे पॅण्डिडेट मास्टर माधवेंद्र प्रताप शर्मा आणि जागृत मिश्रा राहिले. सन्निधी भटला सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. तिला बक्षीस म्हणून 45,000 रुपये मिळाले. रचित गुरनानी आणि मायशा परवेझ यांना अनुक्रमे मुंबईतील मुलांमध्ये आणि मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. त्यांना प्रत्येकी 30,000 रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली.