घटस्फोटासाठी पाठिंबा दिला नाही तर घरी परतणार नाही- तेजप्रताप यादव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मथुरा

पत्नीला घटस्फोट देण्याच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप गुरुवारी वृंदावनच्या चैतन्यविहारमध्ये दिसले. प्रसारमाध्यमांना बघताच ते सहकाऱ्यांसह गाडीतून निघून गेले. कुटुंबातील सदस्य माझ्या घटस्फोटाच्या मागणीला पाठिंबा देत नाहीत ,तोपर्यंत घरी परतणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाटण्यातील एका प्रसारमाध्यमाला फोनवरून त्यांनी ही माहिती दिली. तेजप्रताप यांनी लहान भाऊ तेजस्वीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, दिल्लीत होणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तेजस्वी त्यांच्या बहिणींना भेटण्यासाठी दिल्लीत आले आहेत.

घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर तेजप्रताप लालूप्रसाद यांना भेटण्यासाठी रांचीतील रिम्समध्ये गेले होते. तेव्हा लालू यांनी घटस्फोट घेऊ नये, तर पत्नीशी सामंजस्य ठेवावे असा सल्ला दिला होता. कुटुंबातील इतर सदस्यांनीही तेजप्रताप यांना हाच सल्ला दिला आहे. त्यामुळे नाराज झालेले तेजप्रताप दिवाळीपूर्वीच सुरक्षारक्षकांची नजर चूकवून घरातून निघून आले होते.

घरातून निघाल्यानंतर तेजप्रताप वारणसीत गेले होते. त्यानंतर आता ते मथुरा- वृंदावनमध्ये आहेत. शुक्रवारी ते गोवर्धन परिक्रमा करत होते. त्यांनी सहकाऱ्यांसह राधाकुंडात स्नानही केले. आपल्या घरातील सदस्यांनी आपले म्हणणे समजून घेऊन आपल्या घटस्फोटाच्या मागणीला पाठिंबा दिल्याशिवाय आपण घरी परतणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.