
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे उत्तराखंडमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी डोंगरावरून भूस्खलन होत आहे, यामुळे रस्तेमार्गावर चांगलाच परीणाम झाले आहेत. खराब हवामानामुळे चारधाम यात्रा देखील अधूनमधून स्थगित केली जात आहे. हवामान विभागाने पुढील एका आठवड्यात मुसळधार पावसाचा इशारा देखील जारी केला आहे.
केदारनाथ मार्गावरील रस्ता पावसामुळे सतत बंद होत आहे. गौरीकुंडजवळील पार्किंग क्षेत्रात ढिगारा आणि दगड पडल्यामुळे, शटल सेवेसाठी वापरला जाणारा रस्ता आणि पादचारी मार्ग देखील पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. येथे वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यामुळे, भाविकांना गौरीकुंड आणि सोनप्रयाग परिसरातील सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. संबंधित कार्यरत संस्था पीडब्ल्यूडी या ठिकाणी सतत काम करत आहे आणि मार्ग पादचाऱ्यांसाठी अनुकूल बनवण्यात आला आहे.
गौरीकुंडकडे अडकलेल्या प्रवाशांना पोलिस संरक्षणात सोनप्रयागकडे पाठवले जात आहे. सध्या मुंकटियाजवळही मार्ग बंद आहे. पहिल्या टप्प्यात, फक्त गौरीकुंडहून परतणाऱ्या यात्रेकरूंना सोनप्रयागकडे पाठवले जात आहे. या दोन्ही ठिकाणी रस्ता रुंद झाला आणि प्रवाशांसाठी वाहतूक सुरळीत झाली तर प्रवाशांना सोनप्रयागहून गौरीकुंड आणि केदारनाथकडे पाठवले जाईल.
केदारनाथ धामला येणाऱ्या प्रवाशांनी हवामानाचा अंदाज घेऊनच यात्रेस प्रारंभ करावे असे आता पोलिस प्रशासनाने सांगितले आहे. एनडीआरएफ-एसडीआरएफ सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने लोकांना आवाहन केले आहे की, स्थानिक प्रशासनाने पावसाळ्यात ज्या ठिकाणी थांबण्यास सांगितले आहे त्या ठिकाणी थांबावे आणि पाऊस थांबल्यानंतरच पुढे जावे.