माथेरान घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

सामना प्रतिनिधी। कर्जत

संततधार पावसामुळे रविवारी सकाळी माथेरानच्या घाटात दरड कोसळली. यामुळे काही काळासाठी येथील वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. दरम्यान,रविवारची सुट्टी असल्याने अनेक पर्यटक माथेरानला आले होते त्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.

माथेरान मध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून शनिवारीही पावसाची संततधार कायम होती. त्यातच शनिवार व रविवारची सुट्टी असल्याने माथेरानमध्ये पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. मात्र रविवारी सकाळी ६ च्या सुमारास माथेरान ते वॉटर पाईप दरम्यान दरड कोसळली त्यामुळे पर्यटक वाटेतच अडकले. हे कळताच टॅक्सी चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्याच अडकलेल्या पर्य़टकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दुपार पर्यंत प्रशासनाच्या एकही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट न दिल्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

matheran-landslide-1

माथेरान मध्ये गेल्या दोन दिवसात ३०५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन आम्ही घाट रस्त्यात लक्ष ठेऊन होतो पर्यटकांची विशेष काळजी घेत आम्ही शनिवारी पूर्ण दिवस घाटात वेळ घालवली. पण रविवारी सकाळी ६ वाजता दरड कोसळली. त्यामुळे आम्ही त्वरित घटनास्थळी धाव घेऊन एक गाडी जाईल इतका रस्ता खुला केला. त्यामुळे घाटात फारशी वाहतूक कोंडी झाली नसल्याचे टॅक्सी युनिओनचे अध्यक्ष संतोष शेळके यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या