
संशोधकांनी सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वाधिक स्पष्ट छायाचित्र जारी केले आहे. अमेरिकेच्या ‘इनॉय’ या टेलिस्कोपच्या सहाय्याने हे छायाचित्र घेण्यात आले आहे. सूर्याच्या ज्वाळा म्हणजे जणू फुटफुटणारे पॉपकॉर्न असल्यासारख्या दिसत आहेत. या स्पष्ट फोटोंमुळे सूर्याची स्थिती समजून घेणे, त्यावरील वातावरण आणि त्याच्या उष्णतेचे रहस्य उलगडणे यासाठी फायदा होणार असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले.
‘नॅशनल सायन्स फाऊन्डेशन’चे (एनएसएफ) संचालक फ्रान्स कोर्डोवा म्हणतात, आम्ही नुकतेच या टेलिस्कोपवर काम सुरू केले आहे. त्यामुळे त्याद्वारे येणाऱया छायाचित्रांची आम्ही वाट पाहात होतो. आम्ही छायाचित्रे आणि व्हिडीओ शेअर करणार आहोत. यामुळे सूर्याबद्दल लोकांना जास्तीतजास्त माहिती मिळू शकणार आहे, असेही ते म्हणाले. एनएसएफच्या इनॉय टेलिस्कोपने नुकतीच पाठवलेली छायाचित्रे सर्वाधिक स्पष्ट आहेत. सूर्य हा एकसंघ असल्याचे आम्हाला वाटत होते. मात्र त्याच्या पृष्ठभागावर छोटे छोटे आकार आहेत हे आता स्पष्ट झाले आहे.
खास सूर्याच्या अभ्यासासाठीच
एनएसएफच्या इनॉय टेलिस्कोपद्वारे सूर्याच्या ज्या वातावरणात नेहमी स्फोट होत असतात, त्या वातावरणातील चुंबकीय क्षेत्राचा नकाशा बनविणेही आम्हाला शक्य होणार आहे, असे एनएसएफचे संचालक कोर्डोवा म्हणाले. हे सौर स्फोट पृथ्वीवरील जीवनावर विपरीत परिणाम घडवू शकतात. मात्र इनॉय टेलिस्कोपमुळे सूर्याचा अभ्यास जास्त चांगल्या रितीने करता येणार आहे.




























































