
अलिबाग शहरालगत असलेल्या कांदळवन क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. या अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे आसपासच्या परिसरातील नागरीक त्रस्त झाले आहे.या अळ्यामुळे दुर्गंधी पसरते आहे.
अलिबाग रेवदंडा मार्गावर श्रीबाग परिसरात रस्त्यालगत असणाऱ्या झाडांवर हजारो अळ्या असल्याचे शुक्रवारी दिसून आले. काळसर रंगाच्या या अळ्या झाडावरून रस्त्यावर येत आहेत. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर पडत होत्या. त्यामुळे प्रवासी आणि वाहन चालक हैराण झाले होते. अळ्यामुळे या परिसरात दुर्गंधीही पसरली होती. वनस्पती शास्त्रांच्या अभ्यासकांनुसार ही एक नैसर्गिक प्रक्रीया आहे. पावसाळ्यानंतर या अळ्यांचा प्रजननाचा काळ असतो. मात्र, यावर्षी मुंबईपासून मुरुडपर्यंतच्या कांदळवन क्षेत्रात या अळ्यांचा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. या अळ्यांनी कांदळवनांची पाने खाऊन टाकली आहेत. त्यामुळे ही झाडे सुकल्यासारखी झाली आहेत. कांदळवनांची पानेखाऊन संपल्याने आता या अळ्यांनी आपला मोर्चा इतर झाडांच्या दिशेने वळविला आहे. शहरालगतच्या झांडाना आता अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे.
नेपट्रीक्स नावाचा पतंग ऐव्हेसेनिया प्रजातीच्या कांदळवनांवर अंडी घालत असतो. या अंड्यामधून सुरवंटासारख्या अळ्या बाहेर पडतात. या अळ्या कांदळवनांची पाने खातात. नंतर त्यांचा कोष तयार होतो. कोषातून पुन्हा पतंग तयार होतो. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अंडी घातल्याने जवळपास संपुर्ण किनारपट्टीवरील भागात या अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. ही काही दिवसांची प्रक्रीया आहे. जास्त काळ ही प्रक्रीया सुरु राहीली तर ऐव्हेसेनिया प्रजातीच्या खारफुटीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे अलिबागमधील जेएसएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले.




























































