
2006 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर येथील मुख्यालय, बंगळुरू आणि उत्तर प्रदेशातील रामपूर येथील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड लश्कर ए तोयबाचा दहशतवादी रझाहुल्लाह निझामनी खालिद ऊर्फ अबू सैफुल्लाह खालिद याच्यासह तीन दहशतवाद्यांचा पाकिस्तानातील सिंध प्रांतात हिंदुस्थानी लष्कराने खात्मा केला. लष्करी अधिकाऱयांनी याबाबतची माहिती दिली.
2000 पासून तो नेपाळ येथून लश्कर ए तोयबासाठी दहशतवादी कारवाया करत होता. विनोद कुमार, मोहम्मद सलीम आणि रझाउल्लाह अशी अनेक नावे धारण करून तो वावरत होता. हिंदुस्थानातील अनेक दहशतवादी कारवायांमागे त्याचा सहभाग होता, अशी माहिती लष्करी अधिकाऱयांनी दिली. लश्कर ए तोयबासाठी भरती आणि प्रशिक्षणाचे कामही सैफुल्लाच्या नेतृत्वाखाली होत होते. दरम्यान, नेपाळमधून अनेक वर्षे दहशतवादी कारवाया केल्यानंतर हिंदुस्थानच्या गुप्तचर यंत्रणांना सैफुल्लाहचा सुगावा लागला. त्यामुळे तो नेपाळमधून पाकिस्तानला पळाला होता.
या हल्ल्यांमधील मास्टरमाइंड
- नागपूर येथील आरएसएसच्या मुख्यालयावर 2006 मध्ये त्याने दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. दहशतवादी एका अॅम्बेसेडर कारमधून पोलिसांच्या गणवेशात आले होते, मात्र हल्ल्याआधीच पोलिसांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्याकडून एके 56, रायफल, हॅण्डग्रेनेड आणि आरडीएक्स जप्त करण्यात आले होते.
- 2008 मध्ये उत्तर प्रदेशच्या रामपूर येथील सीआरपीएफच्या कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात जवान शहीद झाले होते. या प्रकरणात एनआयए कोर्टाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
- बंगळुरूत 2005 मध्ये भारतीय विज्ञान संस्थेच्या ऑडिटोरियममध्ये आंतरराष्ट्रीय संमेलन भरवण्यात आले. संमेलनानंतर बाहेर येणाऱया नागरिकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात एका प्राध्यापकाचा मृत्यू झाला होता.

























































