
कोरोनामुळे बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील तीन महिन्यांत हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून मागील 25 ते 40 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी अनेक समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या समस्यांमुळे डॉक्टरांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. हृदयाच्या आरोग्याकडे तरुणांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हृदयविकार हा केवल वृद्धांपुरता मर्यादित नाही तर तरुणदेखील हृदयविकाराला बळी पडत आहेत. हृदयविकारावरील उपचारासाठी येणाऱया रुग्णांमध्ये 25-40 वयोगटातील तरुणांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली असल्याचे अपोलो स्पेक्ट्रा मुंबईचे इंटरनल मेडिसीन एक्स्पर्ट डॉ. तुषार राणे यांनी सांगितले. कोविड – 19मुळे जीवनशैलीत झालेले बदल आणि आरोग्यावर होणाऱया दुष्परिणामांमुळे रुग्णांमधील हृदयाचे कार्य बिघडत असल्याचे डॉ. राणे म्हणाले.
दाहक रसायनांमुळे रक्तवाहिन्या अरुंद
डॉ. राणे पुढे सांगतात की, बैठी जीवनशैली ज्यात अधिक काळ बसणे आणि शारीरिक हालचाल किंवा व्यायाम न करणे आरोग्यासाठी घातक ठरते. तणावदेखील हृदयविकारांना आमंत्रण देणारे ठरू शकते. तणावामुळे नैराश्याचादेखील सामना करावा लागू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती उदास असते तेव्हा शरीरात विशिष्ट संप्रेरके सोडली जातात आणि यातील दाहक रसायनांमुळे रक्तवाहिन्या अरुंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना करतोय रक्तवाहिन्यांवर परिणाम
कोरानामुळे रक्त प्रवाहात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हृदयाला दुखापत होते. छाती जड वाटणे, श्वास घेण्यास त्रास आणि वेदना, अचानक धडधडणे, हृदयाला सूज येणे, पंपिंग क्षमता कमी होणे, हृदयाचा असामान्य ठोको आदी समस्या पोस्ट कोविड रुग्णांमध्ये दिसून आल्या आहेत. हे प्रमाण तरुणांमध्येही अधिक असल्याचे सांगतानाच कोहिनूर हॉस्पिटलचे सीनियर इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. चेतन शहा यांनी हे टाळण्यासाठी चालणे, धावणे, पोहणे किंवा सायकलिंगसारखे पर्याय निवडू शकता. योगामुळे तणाव कमी होतो आणि हृदयाच्या समस्या टाळता येतात, असा सल्ला दिला आहे.































































