मन शांत ठेवा, प्रार्थना करा! कोरोना काळात ‘भावार्थ माऊली’; लतादीदींची आध्यात्मिक भेट

सध्याचा काळ कठीण आहे. या कठीण परिस्थितीत मन शांत ठेवा, देवाची प्रार्थना करा. शेवटी तोच अंतिम आहे.  माझा विश्वास आहे की ज्ञानेश्वर माऊली कोरोनारूपी संकट दूर करतील… या भावना व्यक्त केल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी! निमित्त होतं,  त्यांच्या ‘भावार्थ माऊली’ या नव्या अल्बमचे!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संत ज्ञानेश्वरांचे अभंग घरोघरी पोचवले. ‘ओम नमोजी आद्या’ असू दे किंवा ‘पसायदान’, ‘अवचिता परिमळु’ किंवा ‘रुणूझुणू रुणूझुणू’, ‘रंगा येई ओ’ किंवा ‘विश्वाचे आर्त असू दे…’ हा सारा भक्तिमय ठेवाच आहे. लतादीदींच्या स्वरातील ही गीतं आपण रोज ऐकतोच. पण आता दीदींनी या प्रत्येक गीताचे आध्यात्मिक सार उलगडून सांगण्याचा वेगळा प्रयोग केला आहे. ‘भावार्थ माऊली’ हा अल्बम आज प्रदर्शित झाला आहे. मराठी नववर्ष शुभारंभाला लतादीदींनी दिलेली ही आध्यात्मिक अनुभूतीच जणू.

‘भावार्थ माऊली’ म्हणजे निरूपण अथवा विवेचन नव्हे. तर माऊलींचे अभंग, विराण्या ध्वनिमुद्रित करत असताना जे भाव मनी दाटून आले ते भाव, ते हृदगत म्हणजे ही भावार्थ माऊली, अशा भावना अल्बमच्या सुरुवातीला लता मंगेशकर यांनी व्यक्त केल्या आहेत. सारेगामाच्या ‘यू टय़ूब’वर चॅनेलवर प्रदर्शित झालेल्या या अल्बममध्ये दहा भक्तिगीते आहेत. प्रत्येक गीताच्या सुरुवातीला दीदींच्या आवाजातील ‘भावार्थ’ आहे. दोन -तीन महिन्यांपूर्वीच त्याचे रेकॉर्डिंग झाले आहे.

एक मोठा प्रयोग

यानिमित्त दैनिक ‘सामना’शी संवाद साधताना लतादीदी  म्हणाल्या, मी संत ज्ञानेश्वरांना फार मानते. ज्ञानेश्वर माऊलींनी जसं सहन केलं तशी सहनशक्ती आपल्यात यावी, आपल्या हातून लोकांचे नेहमी चांगले व्हावे, असं मला नेहमी वाटतं. अनेक वर्षे झाली असतील, भालजी बाबांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी वाचायला दिली, पण खरं सांगू ज्ञानेश्वरीतलं मराठी अवघड आहे, पण हळूहळू ते कळायला लागलं. ते जास्त कळायला लागलं त्याचं कारण म्हणजे हृदयनाथ. आम्ही पहिलं गाणे केलं ‘मोगरा फुलला.’ त्यानंतर ज्ञानेश्वरांच्या रचनांवर आम्ही दोन रेकॉर्ड केल्या. पंडित हृदयनाथ यांनी इतकी सुंदर गाणी केलीत की प्रश्नच नाही. आता भावार्थ माऊलीच्या रूपाने एक मोठा प्रयोग केलाय. सगळी मेहनत पंडित हृदयनाथ यांची आहे. लोकांना हा प्रयोग आवडेल, अशी आशा आहे.

मीराबाईंवर काम करणार

संत ज्ञानेश्वरांप्रमाणे संत मीराबाई माझ्या आवडत्या आहेत. त्यांच्या रचनांचा भावार्थमराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांत उलगडायची माझी इच्छा आहे. केवळ संत मीराबाईच नव्हे तर सूरदास, कबीर या तिघांच्या रचनांवर काम करायचा विचार आहे, असे लता मंगेशकर म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या