
सामना प्रतिनिधी । मुंबई
सध्या देशभरात ‘मी टू’चे चक्रीवादळ घोंघावतेय. बॉलीवूड, क्रिकेटपासून ते राजकारणापर्यंत या वादळाचे तडाखे बसले आहेत. दावे-प्रतिदावे, माफीनामा-कोर्टकज्जे सुरू झाले आहेत. ‘मी टू’ला अनेकांचा पाठिंबा मिळत असतानाच गानसम्राज्ञी ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांनीही भाष्य केले असून महिलांचे अधिकार आणि प्रतिष्ठा कोणी नाकारत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी, असा संतप्त सूर लतादीदींनी व्यक्त केला आहे.
‘मी टू’च्या वादळाचा सर्वात जास्त फटका बॉलीवूडला बसला असून अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर लतादीदी म्हणाल्या, कोणीही महिलांशी चुकीचे वागू नये आणि जर कोणी असे वागलेच तर मोकळीक मिळू नये. नोकरदार महिलांचा मान, सन्मान राखलाच पाहिजे, त्यांना त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. योग्य ती जागा मिळाली पाहिजे. जर कोणी त्यांना त्यांचे अधिकार, पद, प्रतिष्ठा हे नाकारत असेल तर त्यांना धडा शिकवला पाहिजे, असे लतादीदींनी स्पष्टपणे सांगितले. ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. यावेळी मीसुद्धा इतकी वर्षे या क्षेत्रात आहे, पण माझ्याशी गैरवर्तन करणारा वाचू शकणार नाही हे लक्षात ठेवा, असेही लतादीदींनी बजावले.
































































