लता सोनवणे यांच्यावर राजभवन मेहेरबान, जात प्रमाणपत्राबाबत निवडणूक आयोगाने अभिप्राय देऊनही कारवाई नाही

भगतसिंह कोश्यारी गेल्यानंतर राजभवनाच्या कारभारात काही सुधारणा झाली असेल, अशी सर्वसामान्य जनतेला अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. मिंधे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत दाखल याचिकेसंदर्भात निवडणूक आयोगाने चार महिन्यांपूर्वीच अभिप्राय देऊनही राज्यपाल रमेश बैस यांनी त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून लता चंद्रकांत सोनवणे या निवडून आल्या. निवडणूक लढविताना त्यांनी आपण ‘टोकरे कोळी’ असल्याचे जात प्रमाणपत्र दिले होते. हे जात प्रमाणपत्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले. त्यानंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले असून तेथे या प्रकरणाला अंतिम स्वरूप मिळाले आहे.

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर बिरसा फायटर्स संघटनेचे अध्यक्ष सुशीलकुमार पावरा आणि या संघटनेच्या राज्यभरातील 522 पदाधिकार्‍यांनी राज्यपालांकडे लता सोनवणे यांना अपात्र ठरविण्यासाठी घटनेच्या कलम 192 अन्वये याचिका दाखल केली. अ‍ॅड. भूषण महाजन यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली. राजभवनाकडून या याचिकेवर निवडणूक आयोगाचा अभिप्राय मागविण्यात आला. मात्र, निवडणूक आयोगाच्या मिंधेगिरीमुळे अभिप्राय मिळण्यास विलंब लागत असल्याने बिरसा फायटर्सने निवडणूक आयोगाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर आयोगाने आपण ऑगस्ट 2023 मध्येच लता सोनवणे यांच्या याचिकेवरील अभिप्राय राजभवनाकडे पाठविल्याचे उच्च न्यायालयासमोर कबूल केले.

निवडणूक आयोगाच्या अभिप्रायावर राज्यपालांनी कारवाई करणे बंधनकारक आहे. मात्र, चार महिने उलटूनही लता सोनवणे यांच्या अपात्रतेसंदर्भात राज्यपाल रमेश बैस यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. मिंधे गटावर राजभवनाकडून होत असलेल्या या मेहेरबानीमुळे सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

तत्काळ निर्णय घ्या, नसता आंदोलन

मिंधे गटाच्या आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. जात पडताळणी समितीने त्यासंदर्भात स्पष्ट निर्वाळा दिला आहे. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे कारवाईसाठी याचिका दाखल केली. निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात अभिप्राय मागविण्यात आला. हा अभिप्राय चार महिन्यांपूर्वीच आला आहे. तरीही राज्यपालांनी सोनवणे यांच्या अपात्रतेसंबंधी कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यपालांनी तत्काळ निर्णय न घेतल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेचे सुशीलकुमार पावरा यांनी दिला आहे.