
खाजगी शिकवणीवरुन मुलास घेऊन येण्यासाठी म्हणून घर बंद करुन गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. महिला आपल्या मुलास घेऊन आली असता चोरटा घरातील बेडरुमध्ये दिसला. त्याने महिलेस आणि मुलास मारहाण करुन पळ काढला. सोबत रोख रक्कम आणि सोन्याचे दागीने असा 1 लाख 28 हजाराचा ऐवज लुटून नेला.
उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात या चोरी प्रकरणी कविता दिलीप मोहटे यांनी तक्रार दाखल केली आहे. 14 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या मुलास खाजगी शिकवणीवरुन आणण्यासाठी घर बंद करुन गेल्या होत्या. त्यांचा मुलगा अथर्व यास सोबत घेऊन 3.30 वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्या. तेंव्हा घराचा कडीकोंडा तोडण्यात आलेला दिसला. घरात गेल्यानंतर बेडरुममध्ये आवाज आला म्हणून त्या तिकडे गेल्या असता बेडरुमध्ये चोरटा कपाटातील साहित्य काढत असताना दिसला. त्यांना पाहताच त्याने फिर्यादीच्या गळ्याला पकडले आणि जोराने धक्का देऊन खाली पाडले. आवाजाने मुलगाही धावत आला असता त्यालाही लाथ मारुन खाली पाडले आणि तिथून पळ काढला. त्यांनी तातडीने आपल्या पतीला या घटनेची माहिती कळवली आणि त्यांना बोलावून घेतले. कपाटाची पाहणी केली असता कपाटातील दोन तोळ्याची सोन्याची साखळी किंमत 80 हजार रुपये, 7 ग्रॅमची सोन्याची राजाराणी अंगठी किंमत 32 हजार रुपये आणि मुलाच्या फिससाठी ठेवलेले रोख 16 हजार रुपये चोरट्याने पळवलेले होते. संबंधित चोरट्यास पाहिल्यानंतर आपण ओळखतो असेही त्यांनी म्हटले आहे. उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

































































