
लातूर शहर आणि जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी 8 मे पासून 13 मेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. त्यामुळे लातूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली. शासन, प्रशासनाने दिलेल्या सूचना नागरिकांनी पायदळी तुडवल्या.
लातूर जिल्ह्यामध्ये सध्या दररोज एक हजारपेक्षा अधिक रुग्ण संख्या निदर्शनास येत आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्युची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाने कडक निर्बंध लागू करावेत अशी मागणी नागरिक करत आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी 8 मे ते 13 मे या कालावधीमध्ये कडक निर्बंध लागू करण्याचे जाहीर केले. आणि आज वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात त्याप्रमाणे घरातून नागरिक खरेदीसाठी म्हणून बाजारपेठेत दाखल झाले.
कोरोना संदर्भात शासनाने, प्रशासनाने दिलेले सर्व नियम नागरिकांनी पायदळी तुडवले. आज रस्त्यावर उतरलेली गर्दी पाहून लातूर शहर आणि जिल्ह्यात कुठेही कोरोना अस्तित्वातच नाही की काय अशी शंका येत होती. अगोदरच जिल्ह्यातील वाढत जाणारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वांची चिंता वाढवत असताना आज उतरली. रस्त्यावरील गर्दी आणखीन किती रुग्ण संख्या वाढवणार याचीच भीती सर्वांना वाटत आहे.



























































