अवकाळी पावसामुळे जळकोट येथे टोमॅटोचा झाला लाल चिखल; शेतकऱ्यांना आर्थिक फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवकाळी पाऊस जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. मागील आठवडय़ात  झालेल्या अवकाळी पावसामुळे  जळकोट येथील शेतकरी श्रीकृष्ण गबाळे, संग्राम सोनटक्के, महेश सोनटक्के यांच्या दोन एकर क्षेत्रातील टोमॅटो पिकाचे चिखलात रुपांतर झाले असून शेतकऱ्यांचे  मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन अनुदान द्यावे आशी मागणी आपद्ग्रस्त शेतक-यांनी केली आहे. जळकोट येथील माजी सैनिक संग्राम सोनटक्के यांनी अतिशय परिश्रम करुन शेतात टोमॅटो, भाजीपाला लागवडीसह फळबाग उभारली आहे. टोमॅटोचे बहारदार पिक शेतात आले होते.

मात्र नुकताच येऊन गेलेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे टोमॅटोचा अक्षरशः लाल चिखल झाला आहे. फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात कलिंगड, पपई, आंबा या फळांचेही  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लॉकडाऊनमुळे शेतातील टोमॅटो बाजारात जाऊ शकले नाहीत. हे कमी म्हणून की काय ते बाजारात जाण्याआधीच त्यावर अवकाळी पावसाने घाला घातला आहे. त्यातून  शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या नुकसानी संदर्भात संबंधितांकडे अर्ज विनंती करुनही अद्याप तरी त्याचा काही फायदा झालेला नाही. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने नुुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी आपद्ग्रस्त शेतक-यांनी केली आहे.