लातूर जिल्ह्यात भुगर्भातून आवाजाची मालिका सुरुच, वेधशाळेकडून भुकंप नसल्याचे स्पष्ट

लातूर जिल्ह्यात सौम्य भुकंपाच्या घटना नंतर काही भागांमध्ये भुगर्भातून मोठ्या प्रमाणात आवाज येण्याची मालिकाच सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे परंतु तो भुकंप नसल्याचे वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे कासारशिरसी परिसरात भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. त्यानंतर लातूर तालुक्यातील मौजे मुरुड अकोला आणि बोरवटी हे भुकंपाचे केंद्र बिंदू झाले होते. त्यानंतर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील काही भागातून भूगर्भातून आवाज ऐकू येत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. दि. 27.09.2025 रोजी सायं. 7.37 वा. लातूर तालुक्यातील दगडवाडी (रामपूर मळा) येथे जमिनीतून आवाज ऐकण्यास आला असून गेल्या तीन दिवसांपासून अशा प्रकारचे आवाज येत असल्याचे स्थानिकांकडून कळविण्यात आले आहे. दि. 28.09.2025 रोजी पहाटे 4.30 वा. सुद्धा जमिनीतून मोठा आवाज आल्याची माहिती मिळाली आहे.

दि. 24.09.2025 पासून मौजे सलगरा, तालुका लातूर येथे भूगर्भातून आवाज ऐकण्यात येत असून शेवटची घटना दि. 28.09.2025 रोजी दुपारी 1.00 वा. घडली आहे. दि. 28.09.2025 रोजी सायं. 5.25 वा. मौजे राणी अंकुलगा, तालुका शिरूर अनंतपाळ येथे भूकंपसदृश्य मोठा आवाज ऐकण्यात आल्याची नोंद झाली आहे.

या संदर्भात राष्ट्रीय भूकंप मापन केंद्र, भूगर्भशास्त्र विभाग, नवी दिल्ली यांचेकडे चौकशी केली असता वरील कोणत्याही घटनेत भूकंपाची नोंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जमिनीत वॉटर फ्लक्स होणे व पोकळ जागेतून गॅस बाहेर पडणे या नैसर्गिक कारणांमुळे अशा प्रकारचा आवाज निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.