
जीवन जगताना काही संकटे अशी येतात की, त्यातून बाहेर कसे पडावे? असा प्रश्न पडतो. परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करता येतो पण जीवनातील संकटांना उत्तरच नसते, असाच काहीसा प्रकार शिवानी माधव देवकते या विद्यार्थ्यानीचा बाबतीत घडला आहे. वडिलांचे निधन झाले त्यातच बारावीचा पेपर त्यामुळे अश्रूंना आवर घालत तिने बारावीचा पेपर दिला. आंत्यविधि आटपून शनिवारी सकाळी अकरा वाजता शिवानीने परिक्षा केंद्रात जाऊन बारावीचा पेपर दिला.
जळकोट येथे संभाजीराव केंद्रे महाविद्यालयात शिवानी बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. ती आभ्यासात हुशार आहे. घरची परिस्थिती गरीबीची असल्यामुळे तिचे आई-वडील उपजिविकेसाठी पुणे येथे कामाला असतात आणि शिवानी आपल्या आजोबांचा गावी अहमदपुर तालुक्यातील गुगदळ येथे राहून शिक्षण घेत होती.
एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करणारे वडील अचानक आजारी पडले आणि उपचारा दरम्यान त्यांचे २० फेबुवारीला निधन झाले. कुंटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यांचे पार्थिव मुळगावी आणल्या नंतर २१ फेब्रुवारी ला सकाळी गुगदळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याचवेळी सकाळी आकरा वाजता जळकोट येथील गुरुदत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तिचा गणिताचा पेपर होता. गावातील नातेवाईकांनी मुलीला धीर देत तिला परीक्षा केंद्रात आणले शाळेतील शिक्षकांनी तिचे सांतवण करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. मुलीनेही दुःख पचवत जिद्दीने गणिताचा पेपर सोडवला.
आमचं भविष्य घडविण्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडील पुण्याला कामाला गेले व वडिलांचे आम्हाला घडविण्याचे स्वप्न अधुरे राहीले. स्वतःचा पायावर आम्ही उभे राहावे अशी अपेक्षा वडिलांची होती आणि म्हणूनच अश्रूंना आवर घालत मुलीने जिद्दिने पेपर सोडवला.



























































